
मुंबई प्रतिनिधी
म्हाडा कोकण मंडळाच्या 2,147 सदनिका आणि 110 भूखंडांच्या खरेदीसाठी अर्ज केलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा पुढील महिन्यात 5 फेब्रुवारीला या घरांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ जाहीर करणार आहे.
पुढील महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 2,264 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. याची लॉटरी मुंबईहून ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीकृत प्रणालीद्वारे काढण्यात येणार आहे. ज्या घरांसाठी म्हाडा लॉटरी काढणार आहे, त्या घरांसाठी 11 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. अर्जाची अंतिम तारीख तीन वेळा वाढवल्यानंतर शेवटची तारीख 6 जानेवारी निश्चित केली होती.
शेवटच्या दिवसापर्यंत 24,911 अर्ज प्राप्त झाले. कोकण मंडळाच्या मुख्याधिकारी रेवती गायकवाड यांनी सांगितले की, या घरांची सोडत दुपारी एक वाजता सुरू होणार आहे. या सोडतीच्या माध्यमातून कोकण विभागातील नागरिकांना नवीन घर मिळू शकणार आहे. लॉटरी जाहीर झाल्यानंतर, ज्या लोकांनी अर्ज केला आहे ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वर जाऊन त्यांचे नाव लकी ड्रॉमध्ये आले आहे की नाही हे तपासू शकतात.
तसेच लॉटरीच्या दिवशी, अर्जदारांना एसएमएस, ईमेल आणि म्हाडा लॉटरी ॲपद्वारे त्वरित निकाल प्राप्त होतील. पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली. अर्जदारांना तात्पुरत्या यादीबाबत हरकती किंवा दावे मांडण्यासाठी 22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. पात्र अर्जदारांची अंतिम यादी 24 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात आली.
आता अंतिम लॉटरी 5 फेब्रुवारीला निघणार आहे. या सोडतीमधील सदनिका आणि भूखंड ठाणे शहर, ठाणे जिल्हा, रायगड आणि सिंधुदुर्ग येथे कोकण मंडळाच्या विविध गृहनिर्माण योजनांतर्गत बांधलेले आहेत. अधिक माहितीसाठी अर्जदार म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वर भेट देऊ शकतात किंवा कोकण मंडळ कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. दरम्यान, म्हाडाच्या या 2264 घरांसाठी 24,911 अर्ज प्राप्त झाले आहेत, परंतु यातील 713 घरांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. म्हाडा गृहनिर्माण आणि 15 टक्के एकात्मिक योजनेतील घरांकडे उमेदवारांनी पाठ फिरवली आहे.