
मुंबई प्रतिनिधी
अटल सेतूवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूसाठीच्या टोल टॅक्समध्ये वाढ न करण्याचा निर्णय फडणवीसांच्या सरकारने घेतला आहे.
त्यामुळे आधीप्रमाणेच अटल सेतूवरील प्रवासासाठी 250 रुपये इतकाच टोल भरावा लागणार आहे. सरकारने पुढचं एक वर्ष अटल सेतूवरील टोलची रक्कम न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरातल्या लोकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
एसटी आणि रिक्षाचं भाडं वाढवल्यानंतर राज्यभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण आता अटल सेतूच्या टोलची दरवाढ टाळल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2024 मध्ये अटल सेतूचं उद्घाटन केलं होतं. राज्य सरकारने अटल सेतूवरुन जाणाऱ्या कारसाठी एका वेळचा टोल 250 रुपयेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढचे 12 महिने तरी अटल सेतूवरुन जाताना तुम्हाला फक्त 250 रुपये टोल भरुन प्रवास करता येणार आहे.
अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंक हा भारतातला सगळ्यात मोठा ब्रिज आहे. हा ब्रिज एकूण 22 किलोमीटरचा आहे. या ब्रिजचा 16.5 किलोमीटरचा भाग हा समुद्रावर तर 5.5 किलोमीटरचा लांबीचा भाग जमिनीवर बांधण्यात आला आहे. हा सहा पदरी ब्रिज समुद्रावर बांधण्यात आला आहे. या ब्रिजमुळे मुंबईतली उपनगरीय भागातून तसेच ठाणे, पालघर आणि रायगडमधून मुंबईत येणाऱ्यांचा प्रवासाचा वेळ वाचतो.
अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूच्या निर्मितीसाठी 17,840 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. या ब्रिजमुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते (आगामी) नवी मुंबई विमानतळ दरम्यानचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.