
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील विक्रोळी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. एका प्रेमी युगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी घेत आयुष्य संपवलं आहे. या दोघांपैकी मुलीचं वय हे 15 वर्षे तर मुलाचं वय 19 वर्षे इतकं होत.
मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्या लग्नाला त्यांच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. रविवारी (26 जानेवारी) सगळीकडे प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम सुरु असताना दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. आत्महत्या करणारी ही मुलगी दुसऱ्या राज्यातली असल्याची माहिती मिळाली आहे. तर आत्महत्या करणारा मुलगा महाराष्ट्रातला होता. त्यामुळे या प्रेम प्रकरणात प्रांतवाद अथवा जातीवाद याचा काही संबंध आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.
आत्महत्या करणारे हे दोघे जण भांडुपच्या हनुमानगरमध्ये राहायचे. रविवारी दुपारी मुलगी आजीसोबत घरातून बाहेर पडली. आजीच्या नकळत ती मुलगी लांब निघून गेली. मुलगी बेपत्ता झाल्याचं समजल्यानंतर भांडुप पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तिचा शोध सुरु केला. तितक्यात काही वेळाने रेल्वे पोलिसांचा भांडुप पोलिसांना फोन आला. बेपत्ता झालेल्या मुलीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. ती मुलगी प्रियकराला सोबत घेऊन रेल्वे स्टेशनवर गेली आणि ट्रेनसमोर दोघांनी आत्महत्या केली.
पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. जीव देण्यापूर्वी दोघांनीही कोणतीही सुसाइड नोट लिहिली होती का, कुठला व्हिडिओ रेकॉर्ड करुन ठेवला होता का, या सगळ्याचा पोलीस शोध घेत आहेत. पण प्रेमी युगुलाच्या आत्महत्येच्या बातमीमुळे अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची तसेच मुलाच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर दोघांच्या आत्महत्येमागे अन्य काही कारण होतं का, ते स्पष्ट होईल.