
नवी मुंबई प्रतिनिधी
आगामी रस्ते बांधकाम प्रकल्पांमुळे नवी मुंबईतील घणसोलीमध्ये 27 जानेवारीपासून पुढील 25 दिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक वळवण्यात येणार असल्याची घोषणा नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केली आहे.
अश्विनी इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड द्वारे केल्या जाणाऱ्या विकासकामांमुळे अनेक प्रमुख मार्ग प्रभावित होणार आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त (वाहतूक) तिरुपती काकडे म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेने (एनएमएमसी) कामाचे कंत्राट दिले असून ते 10० मीटर लांबीचे असून, हे काम 25 दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे घणसोली येथील रस्त्याची कामे पूर्ण करण्यासाठी काही रस्ते बंद ठेवले जाणार आहेत. तसेच अनेक रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. घणसोलीमध्ये 27 जानेवारीपासून पुढील 25 दिवस घणसोली गाव ते घणसोली जंक्शन, सदगुरु हॉस्पिटल ते घणसोली सेक्टर 6 आणि घणसोली शेतकरी शाळा ते सेक्टर 6 मार्गे सदगुरु हॉस्पिटलला जोडणारा रस्ता वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच जोपर्यंत बांधकाम सुरू होत नाही, तोपर्यंत घणसोली मीनाताई हॉस्पिटल ते घणसोली जंक्शनपर्यंतचे अंडरपास बंद राहणार आहेत.
घणसोली गाव ते घणसोली जंक्शन दरम्यान प्रवास करणारी वाहने महादेव मंदिर आणि डी-मार्ट मार्गे घणसोली सेक्टर 6 मार्गे जातील. त्याचप्रमाणे घणसोली सेक्टर 6 मधून जाणारी वाहने सेक्टर 15, 16, 17 आणि 18 मधील डी-मार्टच्या माध्यमातून तळवली गावात वळवण्यात येणार आहेत.
घणसोली जंक्शन ते घणसोली गावाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी नौसील नाका, तळवली गाव किंवा दत्तनगर मार्गे मार्ग देण्यात येईल. रस्ते बांधकामाचे हे काम पुढील 25 दिवस सुरु राहणार असल्याने वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे.