चेन्नई :
तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप घडवणारा निकाल सोमवारी समोर आला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना त्यांच्या पारंपरिक कोलाथूर मतदारसंघात धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. अभिनेते थलापती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी हा पराक्रम साधत राज्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला.
बालेकिल्ला कोसळला; DMK गोटात शांतता
कोलाथूर हा स्टॅलिन यांचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच TVK चे व्ही. एस. बाबू आघाडीवर होते. प्रत्येक फेरीत त्यांनी वाढवत नेलेली आघाडी अखेर निर्णायक ठरली. सुमारे ८ हजार मतांनी स्टॅलिन यांचा पराभव झाला. या निकालानंतर द्रमुक (DMK) पक्षाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली असून, कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
‘किंगमेकर’ ते ‘किंग’; विजयची दमदार एंट्री
राजकारणात पहिल्यांदाच उतरलेल्या थलापती विजय यांनी आपल्या करिष्म्याच्या जोरावर थेट सत्तास्थापनेच्या समीकरणात प्रवेश केला आहे. त्यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने तब्बल १०५ जागांवर आघाडी घेतली असून, राज्यातील पारंपरिक AIADMK आणि DMK या द्रविडी पक्षांच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, स्टॅलिन यांचा पराभव हा केवळ एका जागेचा नाही, तर गेल्या अनेक दशकांपासून रुजलेल्या राजकीय समीकरणांना मिळालेला स्पष्ट संदेश आहे.
त्रिशंकू स्थिती; सत्तासंघर्षाची चिन्हे
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत बहुमतासाठी ११७ जागांची आवश्यकता असताना TVK १०५ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. TVK आणि काँग्रेस यांच्यात सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, स्वतः पराभूत झाल्यामुळे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचा दबाव वाढत आहे. ते पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
तामिळनाडूत नव्या राजकीय पर्वाची नांदी?
या निकालामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करत थलापती विजय यांनी पहिल्याच प्रयत्नात सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचत ‘नव्या युगाची’ चाहूल दिली आहे.
आगामी काही दिवसांत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार असून, राज्यात कोणाची सत्ता येते याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


