पुणे प्रतिनिधी
क्रेडिट कार्डच्या थकबाकी वसुलीच्या वादातून खासगी एजंटांकडून नागरिकाला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पंधरा नंबर चौकात घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, खासगी वसुली यंत्रणांच्या बेकायदेशीर कारभारावर पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
संतापजनक!
हडपसर, पुणे येथे एका व्यक्तीला भररस्त्यात बॅंकेचे वसूली एजंट घेरुन मारहाण करतात. रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे नमूद केले आहे की –
१. वसुली एजंट कर्जदाराला केवळ सकाळी ७:०० ते संध्याकाळी ७:०० या वेळेतच फोन करू शकतात किंवा भेटू शकतात.
२. एजंटांनी कोणत्याही परिस्थितीत… pic.twitter.com/EpFb21DnNe
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 28, 2026
हडपसर परिसरातील या घटनेत संदीप जामदार (वय अंदाजे ३०) यांना तीन वसुली एजंटांनी अडवून बेदम मारहाण केली. जय कासार, विनीत कासार आणि तनिष खुडे अशी आरोपींची नावे असून, त्यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांकडून तपास सुरू असला तरी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
वादातून थेट मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तिघे एजंट एका खासगी क्रेडिट कार्ड कंपनीच्या वतीने थकबाकी वसुलीसाठी जामदार यांचा पाठलाग करत होते. सोमवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी जामदार यांना पंधरा नंबर चौकात अडवले. सुरुवातीला शब्दिक वाद झाला; मात्र काही क्षणांतच परिस्थिती बिघडत गेली आणि एजंटांनी जामदार यांना रस्त्यातच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
या वेळी जामदार यांच्यासोबत असलेल्या महिलेनं हात जोडून “मारहाण करू नका” अशी विनंती केली. तरीही एजंटांनी कोणतीही दखल न घेता शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, “चला पोलीस ठाण्यात, दाखवतो,” अशा धमक्या देत आरोपींनी पीडिताला दहशतीत ठेवण्याचा प्रयत्न केला.
व्हिडिओ व्हायरल, संतापाची लाट
दुपारच्या वेळेत गजबजलेल्या चौकात घडलेल्या या प्रकारामुळे मोठी गर्दी जमली. काही नागरिकांनी संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, त्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “वसुलीच्या नावाखाली गुंडगिरी चालणार का?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांची भूमिका प्रश्नचिन्हाखाली
या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. गंभीर स्वरूपाची मारहाण होऊनही कठोर कलमांखाली गुन्हा का दाखल झाला नाही, याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. “यामुळे अशा एजंटांना अप्रत्यक्षपणे मोकळीक मिळते,” अशी टीका स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी सांगितले की, “घटनेबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. व्हिडिओच्या आधारे अधिक माहिती गोळा केली जात आहे.”
खासगी वसुली पद्धतीवर प्रश्न
घटनेनंतर खासगी बँका आणि वित्तीय संस्थांकडून नेमण्यात येणाऱ्या वसुली एजंटांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमांनुसार अशा एजंटांनी सभ्य पद्धतीने वसुली करणे अपेक्षित असते; मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी दबाव, धमक्या आणि बळाचा वापर होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.
राजकीय प्रतिक्रिया
या घटनेवर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला. “राज्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशी ही घटना आहे. गृहखात्याने याची गंभीर दखल घ्यावी. संबंधित एजंटांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, तसेच संबंधित बँकेची जबाबदारीही निश्चित केली पाहिजे,” असे ते म्हणाले.
कठोर कारवाईची मागणी
नागरिक, सामाजिक संघटना आणि स्थानिक प्रतिनिधींकडून या घटनेतील आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी होत आहे. तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी खासगी वसुली यंत्रणांवर कडक नियम आणि देखरेख आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाला अधिकच गांभीर्य प्राप्त झाले असून, पुढील काही दिवसांत पोलिसांकडून कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


