मुंबई प्रतिनिधी
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे लैंगिक संबंध ठेवत फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्ताला अटक करण्यात आल्याने पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पार्कसाईट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शुक्ला (सहाय्यक आयुक्त, अंधेरी के/पूर्व) यांच्याविरुद्ध एका ३२ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तीन वर्षांपूर्वी विक्रोळी परिसरात ओळख झाल्यानंतर शुक्ला यांनी संबंधित महिलेला लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी जवळीक साधली. पुढील काळात त्यांनी वारंवार लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, पीडितेने लग्नाबाबत आग्रह धरल्यावर शुक्ला टाळाटाळ करू लागल्याने संशय निर्माण झाला. अखेर रविवारी सायंकाळी तिने विक्रोळी येथील पार्कसाईट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवून सोमवारी दुपारी शुक्ला यांना अटक केली.
नितीन शुक्ला हे यापूर्वी मनपाच्या इमारत दुरुस्ती विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच एफ-नॉर्थ वॉर्डमधून त्यांची बदली बी वॉर्डमध्ये झाली होती. सध्या ते अंधेरी के/पूर्व येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते.
या अटकेमुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.


