मुंबई प्रतिनिधी
दीर्घकाळ उपचार घेत असलेल्या वयोवृद्ध कुष्ठरुग्णांच्या सहव्याधींवर प्रभावी उपचार व्हावेत, यासाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. त्यांनी शुक्रवारी (२४ एप्रिल २०२६) ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयाला आकस्मिक भेट देत विविध कामांचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान डॉ. शर्मा यांनी रुग्णालयातील पुरातन इमारतीच्या अंतर्गत कक्षांच्या दुरुस्तीची पाहणी केली. तसेच आंतररुग्ण विभागातील कामांची प्रगती तपासली. रुग्णालय परिसरातील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या उभारणीचे कामही त्यांनी पाहिले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक विद्युत जोडणीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
१३ एकर परिसरात वसलेल्या या रुग्णालयात प्रशासकीय इमारत, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, स्मशानभूमी, तसेच मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची कार्यालये कार्यरत आहेत. याशिवाय कर्मचारी निवासस्थान आणि संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली.
सद्यस्थितीत रुग्णालयात ५५ रुग्ण उपचार घेत असून त्यामध्ये ३० पुरुष आणि २५ महिलांचा समावेश आहे. डॉ. शर्मा यांनी रुग्ण कक्षात जाऊन रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वृद्धत्वामुळे उद्भवणाऱ्या विविध सहव्याधींवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बाह्यरुग्ण विभागात दररोज सुमारे ६० रुग्ण उपचारासाठी येत असून गेल्या तीन वर्षांत १८०० हून अधिक रुग्णांनी येथे सेवा घेतली आहे. निदान झालेल्या कुष्ठरुग्णांवर नियमित उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या पाहणीवेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. अमिता पेडणेकर, उपअधिष्ठाता डॉ. अविनाश खाडे आदी उपस्थित होते.


