मुंबई प्रतिनिधी
इंडोनेशियातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ बाली येथे एका भारतीय कुटुंबाच्या कथित गैरवर्तनामुळे देशाची प्रतिमा मलिन झाल्याची खंत व्यक्त होत आहे. उबुद येथील एका नामांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या या कुटुंबाने हॉटेलमधील वस्तू चोरी केल्याचा आरोप असून, तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून संतापाची लाट उसळली आहे.
INDIAN TOURISTS DO NOT LEARN 🤦🏻🤦🏻
Indian tourists, who stayed at Ubud, Bali (Indonesia) were caught by hotel-staff stealing stuff from the hotel.
Why would you go to a foreign country and do such cheap act/crime??
This is embarrassing to watch as an Indian. pic.twitter.com/ETtxJArCgl
— Tarun Gautam (@TARUNspeakss) April 21, 2026
माहितीनुसार, संबंधित भारतीय कुटुंब १६ ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत हॉटेलमध्ये थांबले होते. चेक-आऊट केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणीसाठी रूममध्ये प्रवेश केला असता काही वस्तू गायब असल्याचे लक्षात आले. यात टॉवेल्स, हेअर ड्रायर, डोअर मॅट, टीव्ही रिमोट बॉक्स तसेच भांडी अशा विविध वस्तूंचा समावेश होता.
संशय बळावल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी पार्किंग परिसरात जाऊन संबंधित पर्यटकांना थांबवले आणि त्यांच्या सुटकेस उघडण्यास सांगितले. झडतीदरम्यान हॉटेलमधील अनेक वस्तू त्यांच्या बॅगांमध्ये लपवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आल्या. काही वस्तू कपडे आणि टॉवेलमध्ये गुंडाळून काळजीपूर्वक ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले.
व्हिडिओत माफीची विनवणी
घटनेचा व्हायरल व्हिडिओ पाहता, कुटुंबातील सदस्य हॉटेल कर्मचाऱ्यांसमोर माफी मागताना आणि त्यांना सोडून देण्याची विनंती करताना दिसतात. कर्मचाऱ्यांनी सर्व साहित्य परत घेतल्यानंतर या प्रकरणी पोलिसांत औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय पर्यटकांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे परदेशात भारतीय पर्यटकांकडे संशयाने पाहिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही पर्यटकांकडून हॉटेलमधील साबण, शॅम्पू, टुथब्रश यांसारख्या किरकोळ वस्तू नेल्या जात असल्याच्या तक्रारी पूर्वीही समोर आल्या आहेत; मात्र या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वस्तू नेण्याचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.


