नवी दिल्ली वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे तरुण नेते पार्थ पवार यांनी आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेत आपल्या संसदीय कारकिर्दीची अधिकृत सुरुवात केली. राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती सिफी राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधीमुळे केवळ एका तरुण नेत्याची संसदेतील एंट्री झाली असे नव्हे, तर पवार कुटुंबातील नवी पिढी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेतही मिळाले.
शपथविधी सोहळ्याला विविध पक्षांतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. विविध राजकीय पक्षांतील नेते एकत्र उपस्थित राहिल्यामुळे हा सोहळा औपचारिकतेपलीकडे जाऊन राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला गेला.
मात्र या शपथविधीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो पार्थ पवार यांचा पेहराव. त्यांनी परिधान केलेले ‘गुलाबी जॅकेट’ उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. हे जॅकेट दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख मानले जात असे. त्यामुळे पार्थ पवारांनी ते जॅकेट परिधान करताच अनेकांच्या मनात अजित पवारांच्या आठवणी जाग्या झाल्या. अनेकांनी या क्षणाला भावनिक श्रद्धांजलीचे रूप दिले. शपथ घेतल्यानंतर उपस्थित नेते व कार्यकर्त्यांनी पार्थ पवारांचे अभिनंदन करताना या भावनिक क्षणाचीही चर्चा केली.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा रंगली की पार्थ पवार यांच्या देहबोलीत आणि बोलण्याच्या शैलीत काही प्रमाणात अजित पवारांची झलक जाणवत होती. त्यामुळे हा शपथविधी केवळ एका संसदीय प्रक्रियेपुरता मर्यादित न राहता, पवार कुटुंबाच्या राजकीय वारशाची पुढची पायरी ठरल्याचे मानले जात आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठी जबाबदारी आली आहे. सध्या पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेली जात असताना, संसदेत पार्थ पवार यांची एंट्री पक्षासाठी नवे राजकीय समीकरण निर्माण करणारी ठरू शकते. विशेषतः तरुण नेतृत्वाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांच्या शपथविधीबाबत काही काळ सस्पेन्स कायम होता. महाराष्ट्रातील इतर खासदारांनी यापूर्वीच शपथ घेतली असताना पार्थ पवार यांचा शपथविधी केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांनी राज्यसभेत प्रवेश करत आपल्या संसदीय कारकिर्दीची औपचारिक सुरुवात केली.
पार्थ पवार यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर त्यांनी यापूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघ येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काही काळ ते सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचे दिसून आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींनंतर आणि अजित पवारांनी शरद पवार यांच्यापासून वेगळी राजकीय वाट निवडल्यानंतर पार्थ पवार पुन्हा सक्रिय होताना दिसले.
आता राज्यसभेच्या माध्यमातून त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची संधी मिळाली आहे. संसदेतून ते पक्षाची भूमिका किती प्रभावीपणे मांडतात आणि महाराष्ट्रातील राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पवार कुटुंबाच्या राजकीय वारशाची नवी पिढी आता संसदेत दाखल झाली असून, आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रीय पातळीवरील समीकरणांमध्ये त्याचा काय परिणाम होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


