नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशासाठी पराक्रम गाजवणाऱ्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सेना, नौदल आणि वायुसेनेतील वीरता पदकांनी सन्मानित जवानांना भारतीय रेल्वेमध्ये आयुष्यभर मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे. या निर्णयामुळे देशासाठी शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नव्या आदेशानुसार, वीरता पुरस्कार विजेत्यांना भारतीय रेल्वेच्या प्रथम श्रेणी, सेकंड एसी (2AC) किंवा एसी चेअर कार या श्रेणींमध्ये एका सहप्रवाशासह मोफत प्रवास करता येणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशासाठी धाडसाने लढणाऱ्या आणि शौर्य गाजवणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ सेना, नौदल आणि वायुसेना पदकांनी सन्मानित सर्व सैनिकांना मिळणार आहे. तसेच, या पुरस्कार विजेत्यांच्या जीवनसाथीलाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये विधवा किंवा विधुर यांचाही समावेश असेल. मात्र, त्यांनी पुनर्विवाह केलेला नसल्यासच ही सुविधा लागू राहणार आहे.
याशिवाय, मरणोत्तर वीरता पुरस्कार मिळालेल्या आणि अविवाहित असलेल्या सैनिकांच्या पालकांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या कुटुंबांनाही सरकारकडून सन्मानाची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे संबंधित सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांना प्रवास खर्चात मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे संरक्षण विभागाने स्पष्ट केले. देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य धोक्यात घालणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे भारतीय रेल्वेकडून लवकरच जाहीर केली जाणार आहेत. ही सुविधा संपूर्ण भारतीय रेल्वे नेटवर्कवर लागू असणार असल्याने देशभर प्रवास करणाऱ्या वीरता पदक विजेत्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
देशासाठी पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांना सन्मान देण्याच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, यामुळे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.


