
मुंबई:प्रतिनिधी
लाडकी बहीण’ योजनेच्या पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम सरकार राबवणार आहे. अर्जाच्या पडताळणीमध्ये जर महिला अपात्र ठरली तर पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा जोरदार सुरू असतानाच
यावरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होतेय. यावर आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वात महत्त्वाचा खुलासा केला आहे.
अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. तसेच शासनानं अद्याप कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेतला नाही, असं तटकरे म्हणाल्या.
आदिती तटकरेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. लाडक्या बहीण योजनेविषयी बोलतांना त्या म्हणाल्या की,वेगवेगळ्या प्रसार माध्यमांतून गैरसमज पसरवले जात आहेत की, लाडकी बहीण योजनेत बदल होणार आहेत. मात्र, एकाही लाडक्या बहिणीचे लाभ किंवा पैसे आम्ही परत घेतलेले नाहीत. तसेच आम्हाला विविध ठिकाणाहून पत्रे येत आहेत की, जे पात्र नाहीत त्यांचा लाभ बंद करायचा. दररोज ५-१० हजार अर्ज येत आहेत. तसेच काही महिला अविवाहित होत्या आणि लाभ घेत होत्या. तर काही महिला इतर राज्यात गेल्या आहेत.
त्याच महिला आता आम्हाला योजना बंद करायची आहे
असे अर्ज करत आहेत, असं तटकरे म्हणाल्या.
काही लोकांनी चारचाकी वाहने खरेदी केलं असेल, काहींना सरकारी नोकरी लागली असेल, पण कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ आम्ही परत मागितला नाही. पण, त्याच बोलत आहेत की, आमचा लाभ परत घ्या .मात्र, अद्याप आम्ही लाभ परत घेतला नाही. जानेवारी महिन्याचा लाभ आता जाणार आहे. २-३ महिन्यांचे लाभ मिळाले आहेत, असं तटकरेंनी स्पष्ट केलं.
त्या म्हणाल्या, काहींना मुलांच्या आधार कार्डचा नंबर दिलाय. अर्जात बऱ्यात त्रुटीही आहेत. अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. योजनेचं मूल्यांकन करणं यात काही नवीन नाही. कोणतीही योजना घ्या, त्या योजनांची दरवर्षी पडताळणी केली जाते. ‘संजय गांधी निराधार योजना’, ‘गॅस सबसिडी’, ‘नमो शेतकरी योजना’ या सर्व योजनांची वर्षातून किमान एकदा पडताळणी होते. ही काही नवीन किंवा जगावेगळी प्रक्रिया नाही. लाडकी बहीण योजनेचं हे पहिला वर्ष असल्यानं याबबत असे गैरसमज पसरवले जात आहे. मात्र, पडताळणी ही नियमित प्रक्रिया आहे, असं सांगत आम्ही एकाही महिलेचा लाभ त्यांच्या इच्छेविना परत मागे घेणार नाही, असं तटकरेंनी स्पष्ट केलं.
२६ तारखेपर्यंत मिळणार हप्ता…
अर्थमंत्री अजित पवारांनी या योजनेच्या हप्त्याबाबत म्हणाले की, माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालूच राहणार आहे. काळजी करू नका. फक्त गरजू महिलांनाच त्याचा लाभ मिळायला पाहिजे. जे श्रीमंत आहेत, कर भरतात, नोकऱ्या आहे, त्यांच्याबद्दल मी वेगळा विचार करेन. परंतु या योजनेसाठी परवाच ३७०० कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. या योजनेचा सातवा हप्ता २६ तारखेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.