
मुंबई:प्रतिनिधी
बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काऊंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी (20 जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे.
अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपासनजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांन स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अहवालात म्हटल्याप्रमाणे, अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळून आलेले नाही. मात्र, पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र, या अहवालामुळे पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे. अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरुन जमा केलेली सामुग्री आणि एफएसएल रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत. अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपाई म्हणून काम करणारा आरोपी अक्षय शिंदेने अत्याचार केला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. 12 ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर 13 ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 12 तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केले. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली.
नेमकं काय घडलेलं?
बदलापूरमधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काऊंटर करण्यात आला होता. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना घटना घडली होती. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली. यानंतर निलेश मोरे यांच्यावर त्याने 3 गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि 2 गोळ्यांचा फायर चुकली. सोबत असलेले दुसरे अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. रिव्हॉल्व्हरमधून झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला, तर दुसरी शरिरावर लागली होती.