नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरील सस्पेन्स अखेर संपला असून पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि बिहारमधील पाच वेळा आमदार राहिलेले नितीन नबीन यांची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता जे. पी. नड्डा यांच्याकडून नितीन नबीन औपचारिकपणे पदभार स्वीकारणार आहेत.
On the election for the party's national president, the BJP says 37 sets of nomination papers were recieved in favour of Nitin Nabin. Only one name, Nitin Nabin, has been proposed as the National President of the BJP. pic.twitter.com/Z8xhbe58j2
— ANI (@ANI) January 19, 2026
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी दिली. पक्षाच्या नियमांनुसार ३६ पैकी किमान ३० राज्यांमध्ये राज्याध्यक्षांची निवड झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षपदाची प्रक्रिया सुरू होते. ही अट पूर्ण झाल्यानंतर १६ जानेवारी २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. सोमवारी दुपारी २ ते ४ या वेळेत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. नितीन नबीन यांच्या समर्थनार्थ एकूण ३७ नामांकन अर्ज सादर झाले असून छाननीअंती सर्व अर्ज वैध ठरले. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार म्हणून नितीन नबीन यांचे नाव जाहीर करण्यात आले आणि त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
वडिलांच्या राजकीय वारशापासून राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत
२३ मे १९८० रोजी पाटणा येथे जन्मलेल्या नितीन नबीन यांचे राजकारणाशी नाते घरातूनच जुळले. त्यांचे वडील किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बांकीपूर मतदारसंघाचे माजी आमदार होते. २००६ मध्ये वडिलांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नितीन नबीन प्रथमच विधानसभेत दाखल झाले.
यानंतर २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ या सलग निवडणुकांत त्यांनी विजय मिळवत पाचव्यांदा आमदारकीची माळ जपली. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत बांकीपूर मतदारसंघातून त्यांना ९८ हजारांहून अधिक मते मिळाली. याच निवडणुकीनंतर नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले असून सध्या ते बिहारचे बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी २०२१ ते २०२२ या काळातही त्यांनी याच खात्याची जबाबदारी सांभाळली होती.
संघटनात्मक अनुभव
नितीन नबीन यांनी केवळ विधिमंडळातच नव्हे, तर पक्ष संघटनेतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक व्यवस्थापनातील अनुभवामुळे त्यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आधीपासूनच चर्चेत होते.
अपेक्षांची पूर्तता
सहा वर्षांपूर्वी जे. पी. नड्डा यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याआधी त्यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याच धर्तीवर नितीन नबीन यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद सोपवण्यात आले होते आणि भविष्यात त्यांनाच राष्ट्रीय अध्यक्षपद मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. अखेर तो अंदाज खरा ठरला असून भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वात आता नितीन नबीन यांचे पर्व सुरू झाले आहे.


