मुंबई प्रतिनिधी
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म रुंदीकरणाच्या कामाचा थेट परिणाम लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवांवर होत असून, पश्चिम रेल्वेने काही महत्त्वाच्या गाड्या तात्पुरत्या स्वरूपात वांद्रे (बांद्रा) टर्मिनसवरून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे नियमित प्रवाशांचे प्रवास नियोजन विस्कळीत झाले असून, मुंबई सेंट्रलवरील स्टॉलधारकांनाही आर्थिक फटका बसू लागला आहे.
मुंबई सेंट्रलवरून सध्या दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर त्यातील एका वंदे भारतला १६ डब्यांवरून २० डब्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे २० डब्यांच्या गाड्या उभ्या करण्याइतकी जागा सध्या उपलब्ध नसल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. या तांत्रिक अडचणीमुळे काही गाड्यांचे मूळ स्थानक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याअंतर्गत कर्णावती एक्स्प्रेस, गोल्डन टेम्पल मेल तसेच पश्चिम एक्स्प्रेस या गाड्या आता मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनसवरून सुटणार आहेत. अचानक झालेल्या या बदलामुळे अनेक प्रवाशांना ऐनवेळी वांद्रे टर्मिनस गाठावे लागत असून, दळणवळण व वेळेचे नियोजन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, या निर्णयाचा फटका मुंबई सेंट्रल स्थानकावरील स्टॉलधारकांनाही बसला आहे. “स्टॉलसाठी टेंडर भरताना स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांची संख्या आणि प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन बोली लावली जाते. आता अनेक गाड्या दुसऱ्या स्थानकावर हलवल्याने आमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर घटला आहे,” अशी प्रतिक्रिया एका स्टॉलधारकाने व्यक्त केली.
प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था लागू राहणार असून, तोपर्यंत प्रवाशांना वांद्रे टर्मिनसचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे.


