
मुंबई:प्रतिनिधी
माहीम खाडीतील पाईपलाईनच्या खाली एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटली नसून मृत व्यक्तीच्या उजव्या हाताच्या दंडावर प्रकाश असे गोंदवलेले आहे. याप्रकरणी माहीम पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
माहीम येथील फिशरमन कॉलनीच्या मागच्या बाजूला असलेल्या खाडीतल्या पाईपलाईनखाली एका 40 ते 45 वयोगटातील व्यक्तीचा बुधवारी मृतदेह आढळून आला. मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून त्याची पाहणी केली असता मृत व्यक्तीचे दोन्ही पाय बांधलेले आढळून आले. शिवाय डाव्या पाय आणि उजव्या हाताच्या दंडावर जखमा आहेत. शिवाय अंगावर काळय़ा रंगाची फुल पॅण्ट, त्यावर सुप्रीम आर्ट वसई असा टेलर मार्प, पिटर इंग्लंड कंपनीचा निळय़ा रंगाचा शर्ट, त्यावर निळय़ा रंगाची नक्षी आहे. माहीम पोलीस अधिक तपास करीत आहेत.