अकोला प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल (वय ७३) यांची मंगळवारी सायंकाळी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर बुधवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे. काही दिवसांत घडलेली ही तिसरी राजकीय हत्या असल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही गंभीर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी हिदायत पटेल हे अकोला जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी मोहाळा येथे मरकझ मशिदीतून नमाज अदा करून बाहेर पडत असताना एका व्यक्तीने अचानक त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोराने त्यांच्या पोटात आणि मानेवर वार केल्याने पटेल गंभीर जखमी झाले. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली.
घटनेनंतर त्यांना तत्काळ अकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. बुधवारी पहाटे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले असून हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, राजकीय वैमनस्य किंवा अन्य कारणांवरून हा हल्ला झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
हिदायत पटेल हे काँग्रेस पक्षातील अनुभवी आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी २०१४ आणि २०१९ या दोन लोकसभा निवडणुकांत काँग्रेसच्या वतीने अकोला मतदारसंघातून उमेदवारी केली होती. अल्पसंख्याक समाजातील प्रश्न, स्थानिक विकास आणि सामाजिक सलोखा यासाठी ते सातत्याने सक्रिय होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय हत्यांच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. २ जानेवारी २०२६ रोजी सोलापूरमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाली होती. बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांतून झालेल्या संघर्षात धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. त्या प्रकरणात १५ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले असून काही आरोपी अटकेत आहेत.
याआधी डिसेंबर महिन्यात रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे शिवसेना (शिंदे गट)च्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची भररस्त्यात निर्घृण हत्या झाली होती. निवडणुकीतील राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय असून, त्या प्रकरणात आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अकोल्यातील ताज्या घटनेनंतर विरोधी पक्षांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. प्रशासनानेही तपासाला गती देत लवकरच हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.


