मुंबई प्रतिनिधी
मुंबईत पोलिस दलाची मान शरमेने खाली घालणारी धक्कादायक घटना उघडकीस आली. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील भाऊसाहेब हिरे उद्यानात वर्दीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने गतीमंद महिलेसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच संतप्त जमावाने संबंधित पोलिसाला पकडून चोप दिला. त्यानंतर त्याला ताडदेव पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहायक फौजदाराला अटक केली आहे.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या उद्यानालगतच पोलिस चौकी आहे. त्यामुळे या घटनेमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नेमके काय घडले?
ताडदेव आरटीओकडे जाणाऱ्या साने गुरुजी मार्गावर महापालिकेचे भाऊसाहेब हिरे उद्यान आहे. लहान मुलांच्या खेळासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फेरफटक्यासाठी हे उद्यान नेहमीच वर्दळीचे असते. सोमवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास गणवेशातील एक पोलिस कर्मचारी एका तरुणीसोबत उद्यानात बसलेला नागरिकांच्या निदर्शनास आला. सुरुवातीला कुणालाही संशय वाटला नाही. मात्र काही वेळातच त्या पोलिसाने तरुणीशी लगट करत अश्लील चाळे सुरू केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले.
नागरिकांचा संताप, पोलिसाला चोप
हा प्रकार पाहताच उद्यानातील नागरिक संतप्त झाले. काही क्षणांतच तेथे मोठा जमाव जमला. संतप्त नागरिकांनी संबंधित पोलिसाला पकडून जाब विचारला आणि त्यानंतर त्याला चोप दिला. उद्यानालगतच पोलिस चौकी असल्याने घटनेची माहिती मिळताच ताडदेव पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमाव शांत करत आरोपी पोलिसाला ताब्यात घेतले.
चौकशीअंती गंभीर बाबी उघड
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या प्राथमिक तपासात संबंधित पोलिस कर्मचारी नशेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच संबंधित तरुणी गतीमंद असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. आरोपी सहायक फौजदार हा पोलिस दलाच्या सशस्त्र विभागात कार्यरत असून सध्या ‘एल विभाग २’ येथे त्याची नेमणूक होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का
या घटनेमुळे ताडदेवसह मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या वर्दीतील पोलिसाकडूनच अशा स्वरूपाचे गैरवर्तन घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या प्रकरणाची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली असून आरोपीविरोधात कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


