मुंबई प्रतिनिधी
राजकारणात इतिहासाची नोंद होईल असा क्षण अखेर मुंबईत साकारला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन बंधू तब्बल वीस वर्षांनी पुन्हा एकत्र आले. शिवसेना–मनसेची अधिकृत युती जाहीर होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

संयुक्त महाराष्ट्र दिन आणि मंगलकलशाच्या मुहूर्तावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी महानगरपालिका निवडणुकांसाठी भक्कम एकजूट जाहीर केली. यापूर्वी दोन्ही कुटुंबांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून या निर्णयाला प्रतीकात्मक सलाम दिला.
“मतभेद होते… पण महाराष्ट्र मोठा” उद्धव ठाकरे
युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले
“मतभेद नक्कीच होते, पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही ते बाजूला ठेवले.
मुंबईवर डोळा ठेवणाऱ्या शक्तींना रोखणे ही काळाची गरज आहे.”
ते पुढे म्हणाले,
“मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला, तर राजकीय खात्मा केल्याशिवाय राहणार नाही.”
उद्धव ठाकरेंनी मराठी मतदारांना भावनिक साद घालत आवाहन केले
“आता तुटू नका, फुटू नका, आणि मराठीचा वसा सोडू नका.”
मुंबई व नाशिक महानगरपालिकांसाठी युती निश्चित झाली असून
इतर महानगरपालिकांतही बहुतेक ठिकाणी समन्वय साधला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“वादांपेक्षा महाराष्ट्र मोठा” राज ठाकरे
राज ठाकरे यांनी युतीचा निर्णय ‘योग्य वेळ’ असल्याचं सांगितलं. ते म्हणाले
“वाद–भांडणांपेक्षा महाराष्ट्र मोठा.
म्हणून आम्ही एकत्र आलो. किती जागा, कोण लढणार
यावर चर्चा नंतर करू.”
राज ठाकरेंनी निवडणूक व्यवस्थापनाविषयीही संकेत दिले
“दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना संयुक्त उमेदवारी दिली जाईल.
फॉर्म भरण्याची वेळ आम्हीच कळवू.”
ते पुढे म्हणाले
“ज्या दिवसाची महाराष्ट्राला प्रतीक्षा होती,
ती घोषणा आज करतो, शिवसेना आणि मनसेची युती झाली.
ही केवळ निवडणुकीपुरती नाही,
तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा नव्याने उभारलेला लढा आहे.”
सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार
दोन्ही नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटावर तीव्र शब्दांत निशाणा साधला.
“ही दगाबाज सरकार आहे; यांना धडा शिकवण्याची सुरुवात झाली,”
असा संयुक्त हल्ला ते दोघे करताना दिसले.
“मुंबईचा महापौर मराठीच होईल,
आणि तो शिवसेना–मनसेचा असेल,”
असा ठाम दावा राज ठाकरेंनी केला.
पत्रकाराने विचारलेल्या प्रश्न
उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल, त्यांना त्यांच्याकडेच कार्यकर्तेच राहणार नाही, असं भाजपची लोकं म्हणतायेत. त्यावर कोण भाजपची लोक? असा सवाल राज ठाकरेंनी केला. त्यावर पत्रकाराने रावसाहेब दानवे यांचं नाव घेतलं. रावसाहेब दानवे प्रतिक्रिया देण्याच्या पातळीचे तरी ते राहिलेत का? त्यांना त्यांच्या पक्षात देखील कुणी विचारत नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर हसत हसत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातातून माईक घेतला अन् खणखणीत उत्तर दिलं.
राजकीय समीकरणे ढवळणार?
ठाकरे बंधूंच्या या अनपेक्षित एकजुटीमुळे
मुंबईसह राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मराठी मतदारांमध्ये नव्या उमेदीची लाट आणि
सत्ताधाऱ्यांपुढे कठीण आव्हान उभे राहिल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
या युतीची घोषणा झाल्यानंतर वरळीत ठीक ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला.


