मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महानगरासह उपनगरांमध्ये पाणीटंचाईचे गांभीर्य वाढत असताना मुंबई आणि उरणसाठी पुढील काही दिवस अधिक कठीण ठरणारे आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी तातडीच्या उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा कपातीचा निर्णय घेतला आहे.
उरणमध्ये रानसाई धरणाचा तुटवडा; आठवड्यातून दोन दिवस कोरडे नळ
रानसाई धरणातील पाणीसाठा अपेक्षेपेक्षा कमी झाल्यामुळे उरण परिसरात आठवड्यातून दोनदा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय MIDC ने घेतला आहे. मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी पाणीपुरवठा उपलब्ध राहणार नाही. उरणला दररोज सुमारे ४१ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असतानाच सध्या केवळ ३० दशलक्ष लिटरपुरतेच पाणी मिळत आहे. त्यामुळे निर्माण झालेली १० दशलक्ष लिटर प्रतिदिनची तूट भरून काढण्यासाठी ही कठोर उपाययोजना करण्यात आल्याचे MIDCने म्हटले आहे. विद्यमान साठा जून २०२६ पर्यंत तग धरू शकेल या उद्देशाने ही कपात आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
मुंबईत २४ तासांची मोठी कपात
मुंबईतील जलवाहिन्यांच्या मोठ्या जोडणी कामासाठी १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १३ डिसेंबर सकाळी ९ या २४ तासांच्या काळात संपूर्ण जलबंदी लागू राहणार आहे. तानसा वेस्ट (१,८०० मिमी), वैतरणा (२,४०० मिमी), तसेच १,२०० मिमी आणि १,५०० मिमी व्यासाच्या महत्त्वाच्या पाईपलाईन जोडणीचे काम या काळात करण्यात येणार आहे.
कोणते भाग राहणार प्रभावित?
• या जलबंदीचा फटका अनेक वॉर्डांना बसणार आहे
के-ईस्ट वॉर्ड : जोगेश्वरी, अंधेरी ईस्ट
एच-ईस्ट वॉर्ड : खार, बांद्रा ईस्ट
जी-नॉर्थ : धारावी
तसेच १३ डिसेंबर रोजी अंधेरी ईस्टच्या काही भागांत पाण्याचा दाब कमी राहणार असून जैस्मीन मिल रोड, माटुंगा कामगार वस्ती, ओमनगर, कांतिनगर, सहार गाव, अग्रिपाडा, कलीना, सीएसटी रोड परिसर, मुंबई विद्यापीठ, यशवंत नगर, सुंदर नगर, कोळीवाडा आणि खार सबवे ते खेरवाडी दरम्यानही पाणीपुरवठा कमी होणार आहे.
नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन
मुंबई आणि उरणमध्ये वाढत्या जलतुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही महिने पाण्याची कमतरता अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने पाणी वापरात काटकसरीचा आग्रह करण्यात येत आहे.


