मुंबई प्रतिनिधी
कल्याण, ठाणे ते लातुर अंतर १०-११ तासांऐवजी केवळ चार तासात पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण, लातूर द्रुतगती महामार्ग प्रस्तावित केला आहे.
अद्याप हा ४४२ किमी लांबीचा महामार्ग कागदावरच आहे. पण आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपूरमध्ये एमएसआरडीसीच्या प्रकल्पांच्या आढावा बैठकीत कल्याण, लातूर द्रुतगती महामार्गाला तत्वत: मंजुरी दिली. त्यानुसार आता एमएसआरडीसीकडून या प्रकल्पासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर सविस्तर प्रकल्प आराखड्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
एमएसआरडीसी राज्यभरात ४२१७ किमी लांबीच्या रस्त्यांची उभारणी करणार आहे. याच रस्त्यांच्या प्रकल्पाअंतर्गत एमएसआरडीसीने कल्याण, लातूर द्रुतगती महामार्ग प्रस्तावित केला आहे. नागपूरमध्ये मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गासह इतर प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी प्रकल्पांचे एक सादरीकरणही करण्यात आले. त्यात कल्याण, लातूर महामार्गाविषयीचीही माहिती देण्यात आली. हा महामार्ग किती आणि कसा महत्त्वाचा आहे याचीही माहिती देण्यात आली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पास तत्वत: मंजुरी दिल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असून आता प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळाची या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या सविस्तर आराखड्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. आराखड्यास मान्यता घेऊन त्यानंतर प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल. या सर्व कामांसाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे येत्या दीड वर्षात कल्याण, लातूर महामार्गाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.
कल्याण, लातूर द्रुतगती महामार्ग अंदाजे ४४२ किमी लांबीचा आहे. हा महामार्ग कल्याण येथून सुरू होऊन माळशेज घाटातून पुढे अहमदनगरला जाईल आणि मग पुढे बीड, मांजरसूंबा, अंबेजोगाईवरून लातूरला येईल आणि लातूरवरून पुढे लातूर जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत येऊन संपेल. कल्याण, लातूर शहर दरम्यानचा महामार्ग ४०० किमीचा असणार आहे. त्यामुळे हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास कल्याण, लातूर प्रवास १० ते ११ तासांऐवजी केवळ चार तासात पूर्ण करता येणार असल्याने मुंबई, लातूर प्रवास भविष्यात अतिजलद आणि सुकर होणार आहे. ४४२ किमीच्या या महामार्गासाठी अंदाजे ३५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाल्यानंतरच या प्रकल्पासाठी नेमका किती खर्च येईल हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, कल्याण, लातूर द्रुतगती महामार्ग माळशेज घाटातून जाणार आहे. यासाठी घाटात ८ किमी लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. त्याचवेळी मुंबई शहर आणि उपनगरवासीयांना हा महामार्ग वापरता यावा यासाठी विरार, अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी कल्याण, लातूर महामार्ग जोडला जाणार आहे.


