सोलापूर प्रतिनिधी
राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत सरळ सवाल केला. “दोघांनी एकत्र येण्याची हिंमत आहे का?”
दुधनी (ता. अक्कलकोट) नगरपरिषदेच्या प्रचारसभेच्या निमित्ताने सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या शेलार यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे बंधू सतत विविध कार्यक्रमांत एकत्र दिसत असले तरी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही, असे सांगत त्यांनी खोचक प्रश्नांची मालिका लावली.
शेलार म्हणाले, “उद्धव आणि राज ठाकरे मुंबईतील कार्यक्रमांत एकत्र दिसतात; पण पुढे नेमकं करणार काय, हे जाहीर करीत नाहीत. त्यांच्या नात्यात खरा विश्वास आहे का? कोणाची भीती वाटते? कुठे माशी शिंकते? त्यांनी एकदा तरी स्पष्ट सांगावं.”
प्रचाराच्या रणधुमाळीत महायुतीतील नेत्यांकडून भाजपवर होणाऱ्या टीकेबाबत ते म्हणाले, “निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होतच असतात. प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र त्याचा विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यभर प्रत्येक ठिकाणी आमची लढत जोरात आहे.”
मुंबई महापालिका निवडणुकीविषयी विचारले असता त्यांनी महायुतीतूनच निवडणूक लढवण्याचा पुनरुच्चार केला. “मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी आहे. कोणत्या घटकांत काय मिसळलं तर काय तयार होतं, हे मला माहीत आहे,” अशा शब्दांत त्यांनी राजकीय मिश्कील टिप्पणीही केली.
राजकीय प्रवेश आणि उमेदवारी वाटपाबाबत शेलार म्हणाले, “भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढते आहे, पण जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. उमेदवारीची अंतिम जबाबदारी ही पक्षाची आहे. बाहेरील नेते आले म्हणजे उमेदवारी ठरते, असा समज करून घेऊ नये.”
निलेश राणेंनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत केलेल्या टीकेवर शेलार यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला “राणेंनी विचार करावा. अशी टीका आम्ही सहन करणार नाही.”
नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्याबाबत मुख्यमंत्री देवendra फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या मताशी ते सहमत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या राजकारणात ‘ठाकरे बंधू एकत्र येणार का?’ यावरून सुरू असलेली अटकळ शेलार यांच्या प्रश्नांनी आणखीच चैतन्यपूर्ण बनली आहे.


