मालवण प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकताच मालवण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे-सेना आणि ठाकरे गटातील जुनी वैरभावना पुन्हा एकदा उफाळून आली असून, याचदरम्यान ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या नव्या आरोपाने खळबळ उडाली आहे.
वैभव नाईक यांनी सोमवारी एक व्हिडीओ शेअर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मालवण दौऱ्यात “पैशांच्या बॅगा” हलवल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओत शिंदे यांच्याबरोबर असलेले काही व्यक्ती कॅमेऱ्यापासून टाळत बॅगा नेत असल्याचा उल्लेख त्यांनी केला असून, याच बॅगांतील पैसा मतदारांना वाटण्यात आल्याचा गंभीर आरोप नाईक यांनी केला आहे.
“मतदारांना पैसे वाटप… शिंदे-सेना धुतल्या तांदळासारखी नाही”
नाईक म्हणाले,
“निलेश राणेंनी भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला, पण स्वतः शिंदे-सेना तरी कुठे स्वच्छ आहे? परवा एकनाथ शिंदे मालवणात आले, त्यामागून बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन धावताना दिसत आहेत. हा पैसा नंतर मतदारांना वाटण्यात आला. सत्तेवर राहून मिळविलेला हा भ्रष्ट पैशाचा साठा आहे.”
त्यांनी पुढे शिंदे-सेनेच्या कार्यपद्धतीवर टीका करत म्हटले,
“सत्ता मिळविण्यासाठी पैसा आणि पैशातून सत्ता — हेच धोरण प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे. मालवणची जनता हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी विचारपूर्वक मतदान करील, अशी अपेक्षा आहे.”
राणेंनीच काही दिवसांपूर्वी भाजपवर ठेवले होते आरोप
काही दिवसांपूर्वीच आमदार निलेश राणेंनी भाजपवर रोकड वाटपाचे आरोप करत एका पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली होती. २५ लाखांची रोकड जप्त केल्याचा दावा त्यांनी केला होता. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रावरही राणेंनी आक्षेप घेतला होता.
आता मात्र वैभव नाईकांनी राणे आणि शिंदे-सेनेवरच उलटा आरोप करत समोर आणलेल्या व्हिडीओमुळे निवडणूक परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
मालवणच्या गरम राजकारणात हे आरोप-प्रत्यारोप किती वजनदार ठरतात, याकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचेच लक्ष लागले आहे.


