मालवण प्रतिनिधी
मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वीची रात्र मोठ्या गदारोळात गेली. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्री घडलेल्या प्रकरणाने वातावरण आणखी तापवले.
मध्यरात्री पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका पांढऱ्या कारला थांबवले असता दीड लाखांची रोकड आढळून आल्याची प्राथमिक माहिती आहे. ही कार भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या नावावर असल्याचे समोर आले. रोकड मिळताच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तसेच आमदार निलेश राणे यांनी भाजपकडून ‘पैसे वाटप सुरू असल्याचा’ आरोप करत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.
सदर कार पोलिसांनी मालवण पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब व अजिंक्य पाताडे हे नंबरप्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निलेश राणेंनी केला. “मी पोलीस ठाण्यात पोहोचेपर्यंत तक्रारही दाखल झालेली नव्हती. पंचनामा झाला नव्हता, निवडणूक अधिकारीही आले नव्हते,” असे ते म्हणाले.
राणे पुढे म्हणाले, “रात्री 10 नंतर प्रचारबंदी लागू असताना ही रोकड मध्यरात्री गाडीमध्ये सापडते. पोलीस लाईट बंद करून काय करत होते? भाजप नेत्यांना सोडवायला आलेली गाडीही नंबरप्लेटविना होती, तिच्यात भाजपचा गमछाही होता. या सर्वांवर तत्काळ कारवाई व्हावी.”
स्पेशल स्क्वॉडने नाकाबंदीत ही कार पकडली असून आगेची चौकशी निवडणूक आयोग व मालवण पोलिसांकडून सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे मतदानापूर्वी मालवणचे राजकीय वातावरण अक्षरशः प्रज्वलित झाले आहे.


