मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील व्यावसायिकांना लक्ष्य करून सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून लूट करणाऱ्या टोळीचा आरे पोलिसांनी अवघ्या सात तासांत पर्दाफाश केला. २० ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींच्या टोळीने अनेक व्यावसायिकांना जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
देवनारमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाला २४ वर्षीय शहरीन औरंगजेब कुरेशी हिने ओळखीचा बहाणा करत संपर्क साधला. पवईतील एका हॉटेलमध्ये भेटीच्या निमित्ताने तिने व्यावसायिकाला बोलावले. त्यानंतर तिच्या साथीदारांसह त्या व्यावसायिकाला गोरेगाव-आरे परिसरातील जंगलपट्टीकडे नेण्यात आले. तेथे अचानक मिरची पावडर टाकून त्याला गाठण्यात आले आणि गळ्यातील चार तोळ्यांची सोन्याची चेन लंपास करण्यात आली.
घटनेनंतर तातडीने तक्रार दाखल होताच आरे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. देवनार आणि डोंबिवली परिसरातून फक्त सात तासांत चारही आरोपींना अटक करण्यात यश आले.
अटक झालेल्यांमध्ये विशाल सिद्धार्थ वाघ (२७), नमेश नागेश सुर्वे (२३), जहागीर सलाउद्दीन कुरेशी (२५) आणि शहरीन औरंगजेब कुरेशी (२४) यांचा समावेश आहे. चौघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांनी अशा पद्धतीने किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास सुरु आहे.
दरम्यान, पोलिसांनी चोरी गेलेला मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत केला आहे. प्राथमिक तपासात या टोळीने मुंबईतील वयस्कर व्यावसायिकांना लक्ष्य करून अशाच प्रकारे लूटमार केल्याचा संशय बळावला आहे. या रॅकेटमागे आणखी कोणी आहे का, हे शोधण्यासाठी आरे पोलिसांचा तपास सुरूच आहे.


