ठाणे प्रतिनिधी
देशभराचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) अभूतपूर्व यश मिळवले. भाजपा, जनता दल (युनायटेड) आणि लोजपा (रामविलास) या घटक पक्षांनी तब्बल २०६ जागांवर आघाडी घेत विजयाचा झेंडा फडकावला. महागठबंधनला अपेक्षेपेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागले. विजयाचा जल्लोष सुरु असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिहारच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना महिलांच्या मतदानातील उत्स्फूर्त सहभागाचा विशेष उल्लेख केला. “बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा विकासाला कौल दिला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामावर ठाम विश्वास दाखवला आहे. पूर्वी ‘समोसे में आलू, तब तक लालू’ अशी घोषणा होती; पण काळ बदलला आहे. आज जनतेला विकास हवा आहे. आमच्या लाडक्या बहिणींनी कमाल केली आणि विकासराजाला पाठिंबा दिला,” असे ते म्हणाले.
“लालूंचे जंगलराज नाकारले”
शिंदे यांनी लालू प्रसाद यादव यांच्या सत्ताकाळातील परिस्थितीचा उल्लेख करताना जनतेने आता स्थैर्य आणि विकासाला पसंती दिल्याचे सांगितले. “त्या काळात संध्याकाळी सहा नंतर लोक बाहेर पडायला घाबरायचे. व्यापारी दुकानं बंद करायचे. दिवसाढवळ्या गुन्हे घडायचे. आज परिस्थिती बदलली आहे. डबल इंजिन सरकारने स्थैर्य आणि विकास दिला यावर जनता समाधानी आहे,” असे शिंदे म्हणाले. काँग्रेसच्या कामगिरीवर टीका करत त्यांनी, “विरोधी पक्षनेत्याइतक्या जागाही त्यांना मिळालेल्या नाहीत,” असेही म्हटले.
“महिला मतदारांचा निर्णायक प्रभाव”
शिंदेंच्या प्रतिक्रियेत महिला मतदारांचा उल्लेख मध्यवर्ती होता. “महाराष्ट्रात जशी लाडकी बहिण योजना लोकांना भावली, तसाच विश्वास बिहारमध्येही महिलांनी दाखवला. मोठ्या प्रमाणात मतदान करून महिलांनी दोन्ही राज्यांत बदल घडवून आणला आहे. बिहारचा विजय हा बहिणींच्या आशीर्वादाचा आहे,” असे ते म्हणाले.
“महाराष्ट्रासारखेच बिहारमध्येही ठोस बहुमत”
शिंदे यांनी बिहारतील विजयानंतर अमित शहा यांच्या रणनीतीचे कौतुक केले. “मोदींची दूरदृष्टी, नितीश कुमार यांचे नेतृत्व आणि शाहांची चाणक्यनीती, या तिहेरी इंजिनमुळे बिहारमध्ये विकासाचे काम वेगात झाले. मी बिहारला गेलो असता लोकांनी दिलेला प्रतिसाद पाहून आत्मविश्वास वाढला,” असे ते म्हणाले.
मतदार यादीतील बदलांवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवरही शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. “प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होती. काही जण टीका करण्यासाठीच टीका करतात,” असे ते म्हणाले.
“महायुती स्थानिक निवडणुकांमध्येही विजयी”
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आत्मविश्वास व्यक्त करत शिंदे म्हणाले, “कामाच्या जोरावर महायुतीला लोक पुन्हा पाठिंबा देणार आहेत. महाराष्ट्रात जसे ठोस बहुमत मिळाले तसेच पुढील निवडणुकांतही मिळेल.”
बिहारच्या निकालामुळे एनडीएचे राजकीय समीकरण अधिक भक्कम झाले असून, आगामी निवडणूक राजकारणात हा विजय निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.


