कल्याण प्रतिनिधी
कल्याणमधील रौनक सिटी या हाय, प्रोफाईल सोसायटीत अवघ्या १४ वर्षांच्या मुलीने १९ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज उघडकीस आली. रिद्धी खराडे असे या मुलीचे नाव असून ती उल्हासनगरातील एका नामांकित शाळेत आठवीत शिक्षण घेत होती.
या संपूर्ण प्रकारामुळे सोसायटीत तसेच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, रिद्धीने हा टोकाचा निर्णय स्वतःच्या मोठ्या बहिणीच्या समोरच घेतला.
ओपन डे नंतर वाढली चिंता
मिळालेल्या माहितीनुसार, आज शाळेत ओपन डे होता. अलीकडेच झालेल्या परीक्षांचे गुण शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना आणि पालकांना दाखवण्यात आले. रिद्धी सकाळी शाळेत गेली होती आणि दुपारी घरी परतली. शाळेत मिळालेल्या मार्कांबद्दल ती अस्वस्थ असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.
तिची आई कामानिमित्त ठाण्याला गेली होती. रिद्धी घरी आजी, आई आणि बहिणीसह वास्तव्यास होती. घरी आल्यानंतर ती तणावात असल्याचे बहिणीने पाहिले. काही वेळातच ती सरळ १९व्या मजल्यावर गेली आणि खाली उडी घेतली.
पोलिसांची धावपळ, तपास वाढवला वेग
घटना घडताच सोसायटीतील रहिवासी बाहेर पडले. खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. मुलगी पडल्यावर तिचे नातेवाईक कोणत्या रुग्णालयात घेऊन गेले याबाबत सुरुवातीला कोणालाच माहिती नव्हती, त्यामुळे पोलिसांना काही काळ गोंधळाला सामोरे जावे लागले.
थोड्याच वेळात रिद्धीची आई आणि बहिण समोर आल्या. प्राथमिक तपासात परीक्षेत कमी गुण मिळाल्याने ती नैराश्येत गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात असला तरी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
सोसायटीत शोककळा
अवघ्या १४ वर्षांची मुलगी अशा पद्धतीने आयुष्य संपवून गेल्याने रौनक सिटी सोसायटीत शोककळा पसरली आहे. रहिवाशांनीही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
परीक्षा आणि गुणांच्या तणावामुळे विद्यार्थी गंभीर निर्णय घेत असल्याच्या घटना राज्यभर वाढत चालल्याचे चिंताजनक चित्र या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आले आहे.


