
कल्याण प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) निवडणुकीची धामधूम सुरू होताच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाणे ग्रामीण संपर्कप्रमुख साईनाथ तारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ते भाजपच्या गळाला लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
ठाकरे गटातील सक्रिय आणि प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जाणारे साईनाथ तारे हे ठाणे जिल्ह्यातील अनुभवी संघटक आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, शेवटच्या क्षणी उमेदवारी सचिन बासरे यांना देण्यात आल्याने तारे नाराज झाल्याचं बोललं जातं.
दरम्यान, तारे यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवले असून, त्यात त्यांनी “प्रकृती अस्वास्थ्य” हे अधिकृत कारण दिलं आहे. मात्र, “पक्षातील काही लोक माझ्या कामकाजात अडथळे निर्माण करत होते”, असा उल्लेखही त्यांनी राजीनामापत्रात केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अलीकडेच ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता तारे यांचा राजीनामा हे ठाकरे गटासाठी आणखी एक मोठं नुकसान मानलं जात आहे. सध्या तारे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे ठाणे ग्रामीण आणि कल्याण परिसरातील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता आहे.
साईनाथ तारे हे शिवसेना उपनेते विजय साळवी यांचे निकटवर्तीय असून, ठाणे ग्रामीण भागात त्यांचा मजबूत जनाधार असल्याचं मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा परिणाम आगामी केडीएमसी निवडणुकीवर होऊ शकतो, असं राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
उद्धव ठाकरे गटाने या घडामोडीवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर तारे यांचा राजीनामा हा ठाकरे गटासाठी निश्चितच धक्कादायक मानला जात आहे.