सातारा प्रतिनिधी
जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांचा माहोल चांगलाच रंगू लागला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच राजकीय तापमान वाढले असून, पहिल्याच दिवशी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसत आहे.
सातारा, महाबळेश्वर, वाई, फलटण आणि म्हसवड या नगरपरिषदांसाठी ४२ हून अधिक इच्छुकांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) कडून अर्ज घेतले आहेत. त्यामुळे भाजपनंतर इच्छुकांच्या संख्येत राष्ट्रवादी शरद पवार गट पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील एकूण ९ नगरपरिषद आणि मेढा नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. महायुतीच्या गोटात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीनही पक्षांचे मंत्री, आमदार आणि खासदार असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात असले तरी, शरद पवार गटाने पहिल्याच दिवशी दाखवलेली ताकद लक्षवेधी ठरली आहे.
भोसले राजेंची एकजूट, पण नाराजांची नव्या घरात पसंती
सातारा नगरपरिषदेची निवडणूक सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या एकत्रित नेतृत्वाखाली भाजपच्या चिन्हावर लढवली जाणार आहे. दोन्ही राजेंनी एकत्र येत पॅनेल उभे केले असले तरी त्या पॅनेलमध्ये स्थान न मिळणाऱ्यांनी महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षांकडे झुकते माप दिलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी (शरद पवार गट) या नव्या पॅनेलची तयारी सुरू असून, त्यासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे स्वतः फील्डवर उतरले आहेत. आतापर्यंत सातारा पालिकेसाठी १५ उमेदवारांनी अर्ज घेतले असून, या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून जिल्हाभर अर्जांचा वर्षाव
वाई नगरपरिषदेच्या ५, महाबळेश्वरच्या ९, म्हसवडच्या १० आणि फलटणच्या २ इच्छुकांनी शरद पवार गटाकडून अर्ज घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ४२ पेक्षा अधिक इच्छुक राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडे झुकले आहेत.
हे इच्छुक बहुतेक सर्वसामान्य कार्यकर्ते असले तरी, त्यांच्याद्वारे स्थानिक राजकारणात महायुतीच्या पॅनेलना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नगराध्यक्षपदाची चर्चा सुरूच
नगराध्यक्षपदासाठी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून अनेक दिग्गजांनी रस दाखवला आहे. काही जण अर्ज भरण्याच्या तयारीत असून, त्यांची नावे लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
शिंदेंच्या रणनीतीकडे सगळ्यांचे लक्ष
या पक्षाकडून सर्वाधिक इच्छुक सातारा, महाबळेश्वर, वाई आणि म्हसवड या नगरपरिषदांसाठी असल्याने येथील मंत्री शंभुराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले आणि मकरंद पाटील यांच्या पॅनेलसमोर शरद पवार गटाने थेट आव्हान उभे केले आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आता कोणती रणनीती आखतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाचे
जिल्ह्यात ९ नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर
पहिल्याच दिवशी शरद पवार गटाकडून ४२ हून अधिक अर्ज
दोन्ही राजेंचे पॅनेल एकत्र, पण नाराज कार्यकर्त्यांनी शोधली पर्यायी दारं
शशिकांत शिंदे यांनी दाखवली बालेकिल्ल्यातील ताकद
महायुतीच्या मंत्र्यांना आणि आमदारांना टफ फाईट देण्यासाठी राष्ट्रवादीची तयार


