पुणे प्रतिनिधी
राज्यातील सत्तेच्या वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर वादाचे वारे आणखी वेगाने वाहू लागले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
मेवाभाऊंच्या राज्यात…
१८०० कोटींची जमीन
३०० कोटींत खरेदी,
स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये!उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली.…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 5, 2025
पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीला तब्बल १,८०० कोटींच्या जमिनीचा व्यवहार केवळ ३०० कोटींमध्ये करण्यात आल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. त्यांनी दावा केला की, जमीन मालकांना विश्वासात न घेता आणि सातबारा उतारा क्लिअर नसताना हा व्यवहार पार पाडण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून सविस्तर माहिती मागवली आहे. त्याचबरोबर राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. “प्राथमिक तपासात काही मुद्दे अत्यंत गंभीर दिसत आहेत. सर्व माहिती समोर आल्यानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणात पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना पार्थ पवार यांनी, “मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. व्यवहार पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने झाला आहे,” असा दावा केला आहे.
दुसरीकडे, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या अजित पवारांनी या प्रकरणावर भाष्य करण्याचे टाळले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता ते थेट कार्यक्रमस्थळी रवाना झाले.
राजकीय वर्तुळात आता या चौकशीचा आणि अजित पवारांच्या भूमिकेचा पुढील काही दिवसांत नेमका काय कलाटणी घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


