पुणे प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात तिघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात आले. गेल्या वीस दिवसांपासून ग्रामस्थांना दहशतीत ठेवणाऱ्या या बिबट्याचा शोध रात्री उशिरा ड्रोनच्या मदतीने घेतला गेला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रथम डार्ट मारण्यात आला, मात्र तो लक्ष्य भेदू शकला नाही. डार्ट चुकल्यानंतर बिबट्या चवताळला आणि वनकर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. अखेर तातडीने कारवाई करत तैनात असलेल्या दोन शार्पशूटरनी तीन राऊंड फायर करत बिबट्याचा प्राण घेतला.
या बिबट्याने १३ वर्षीय रोहन बोंबेचा बळी घेतलेल्या ठिकाणापासून केवळ ४०० मीटर अंतरावर ही कारवाई पार पडली. अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाचा नर बिबट्या असल्याचे प्राथमिक अंदाज असून त्याच्या शरीरावरून आणि ठश्यांवरून हा तोच नरभक्षक असल्याची पुष्टी करण्यात आली.
‘तिघांचे बळी आणि उसळलेला संताप’
शिरूर परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये सलग तिघांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला होता.
* १२ ऑक्टोबर : शिवन्या शैलेश बोंबे (वय ५)
* २२ ऑक्टोबर : भागुबाई रंगनाथ जाधव (वय ८२)
* १ नोव्हेंबर : रोहन विलास बोंबे (वय १३)
पिंपरखेड, जांबूत आणि परिसरातील नागरिकांनी महामार्ग रोखून आंदोलन, जाळपोळ करत वनविभागावर निष्क्रियतेचे आरोप केले. ३ नोव्हेंबरला पुणे-नाशिक महामार्ग तब्बल १८ तास ठप्प ठेवण्यात आला. संतप्त जमावाने वनविभागाचे वाहन आणि बेस कॅम्पलाही आग लावली होती.
‘आदेशानंतर सुरू झाली मोहीम’
निरंतर दबावानंतर गुन्हेगार घोषित बिबट्याला दिसताक्षणी ठार मारण्याचे आदेश वनविभागाने दिले. पुणे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी मुख्य वन्यजीव रक्षकांकडून विशेष परवानगी मिळवली.
या मोहिमेसाठी
‘डॉ. सात्विक पाठक (पशुवैद्यक)’
जुबिन पोस्टवाला आणि डॉ. प्रसाद दाभोळकर (शार्पशूटर)
तसेच वनविभागाची विशेष टीम तैनात करण्यात आली होती.
‘ड्रोन शोध आणि निर्णायक गोळीबार’
रात्री कॅमेरा ट्रॅप व तीन थर्मल ड्रोनच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. बिबट्या दिसल्यावर त्याला डार्टने झोपवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. चवताळलेल्या बिबट्याने हल्ल्याची तयारी केल्याने शार्पशूटरने गोळी झाडली आणि बिबट्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शव गावकऱ्यांना दाखवत माणिकडोह बिबट प्रकल्पात पोस्टमॉर्टेमसाठी हलविण्यात आले.
ग्रामीणांचा त्रास, भय, संताप आणि अखेर झालेल्या कारवाईनंतर पिंपरखेड परिसरात आता निष्कांतीचे वातावरण दिसत असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने पुढील काही दिवस सतर्कता वाढवली आहे.


