
पुणे प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जेरबंद केले. आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्त असलेल्या या अधिकाऱ्याने तक्रारदाराच्या कुटुंबातील गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्याच्या नावाखाली दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे.
अटकेतील अधिकारी प्रमोद चिंतामणी (वय 35) असा असून, त्याला रविवारी पेठेत उंटाड्या मारुती मंदिराजवळ सापळा रचून पकडण्यात आले. समर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
‘जामीन मिळवण्यासाठी दोन कोटींची मागणी’
तक्रारदाराच्या वडिलांना एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर चिंतामणी हे तपास अधिकारी म्हणून या प्रकरणात काम पाहत होते. आरोपी अधिकाऱ्याने मदत आणि जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यापैकी एक कोटी स्वतःसाठी आणि उर्वरित रक्कम वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला देण्याचे सांगण्यात आल्याची माहिती एसीबीने दिली.
प्राथमिक पडताळणीनंतर ५० लाखांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदाराकडून 46 लाख 50 हजार रुपये स्वीकारताना एसीबीने आरोपीला रंगेहात पकडले.
‘रोख रक्कम, मोबाइल आणि ओळखपत्र जप्त’
कारवाईदरम्यान आरोपीकडून 45 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम, सॅमसंग फोल्ड आणि ॲपल आयफोन असे दोन महागडे मोबाईल फोन, तसेच शासकीय ओळखपत्र जप्त करण्यात आले. आणखी संबंधित तपास सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
भ्रष्टाचाराविरोधातील या मोठ्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तर नागरिकांच्या तक्रारींवर तत्परतेने कारवाई होत असल्याने एसीबीचे पाऊल कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


