
पुणे प्रतिनिधी
पुणे पोलीस आयुक्तालयात शनिवारी संध्याकाळी एक अनोखी आणि धक्कादायक घटना घडली. आयपीएस अधिकारी असल्याचा आव आणत थेट पोलीस आयुक्तालयात पोहोचलेल्या तरुणाचा फोलपणा त्यानं घेतलेल्या नावामुळेच उघड झाला. मित्रही आयपीएस असल्याची फुशारकी मारणाऱ्या या तरुणाने ज्याचं नाव बॅचमेट म्हणून घेतलं, तोच खरा अधिकारी समोर येताच या ‘बोगस आयपीएस’चं पितळ उघड पडलं.
सागर वाघमोडे (रा. सांगोला, सोलापूर) असं या आरोपीचं नाव असून बंडगार्डन पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वत:ला आयपीएस असल्याचे भासवत वाघमोडे थेट आयुक्तालयात दाखल झाला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करताना त्याने स्वत:ची ओळख ‘सेवा अधिकारी’ अशी करून दिली. बोलण्यातील सुसंगती नसल्याने पोलिस अधिकाऱ्यांनी शंका घेतली. त्यादरम्यान वाघमोडेने “माझा बॅचमेटही आयपीएस आहे” असं म्हणून एका अधिकाऱ्याचं नाव उच्चारलं. इतक्यात योगायोगानं तेच आयपीएस अधिकारी तिथे आले आणि सत्य समोर आलं.
धाडसाने आयपीएस असल्याचा आव आणत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संवाद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाघमोडेला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून आयुक्तालयात येण्यामागील हेतूची चौकशी सुरू आहे. कोणाशी भेटायचं होतं? स्वतःची खोटी ओळख निर्माण करून काय साध्य करायचं होतं? याबाबत तपास केला जात आहे.
महानगरात येणाऱ्या नागरिकांची दक्षता घेणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या दक्षतेमुळे वेळेतच या प्रकरणाचा भंडाफोड झाला. थेट आयुक्तालयात येऊन ‘मी आयपीएस आहे’ असं सांगण्याची हिम्मत दाखवणाऱ्या या तरुणाची ही बतावणी अखेर त्यालाच महागात पडली आहे.


