सातारा प्रतिनिधी
घरची परिस्थिती कठीण, कोणाची आई धुणीभांड्यांचे काम करते, कोणाचे वडील शेतमजूर आहेत, तर काहींना आईवडीलच नाहीत. तरीही शिक्षणाची ओढ कायम ठेवणाऱ्या या मुलींसाठी साताऱ्यातील रा. ब. काळे विद्यालय पुढे सरसावले आहे.
शाळेने एक आगळी योजना राबवित २२ गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून, या मुलींचे संपूर्ण शिक्षण ‘दत्तक’ घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाचे नामकरण ‘आय सपोर्ट’ असे करण्यात आले आहे. या अंतर्गत विद्यार्थिनींना लागणारे वही, पेन, पेन्सिल, गणवेश अशा सर्व शैक्षणिक गरजांची पूर्तता शाळेमार्फत केली जाणार आहे.
मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांनी सांगितले, “आमच्या शाळेत अनेक मुली अत्यंत गरिब कुटुंबांतील आहेत. घरची परिस्थिती त्यांच्या शिक्षणात अडथळा ठरू नये म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला. यातून प्रत्येक मुलीला शिक्षणासाठी लागणारे साहित्य मोफत देण्यात येईल.”
या उपक्रमाला पालक, माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. माजी विद्यार्थी स्वप्नील बनकर आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य चंद्रकांत जडगे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची देणगी दिली.
तसेच अनेक पालकांनी ‘आय सपोर्ट’ योजनेत सहभाग घेत, आर्थिक व वस्तुरूप मदत केली आहे.
शाळेतील माधुरी भोईटे, आशा वाघमोडे, वर्षा भोसले, ज्योती ढमाळ, विजय माने, शीतल सुतार आणि श्वेता शिंदे हे शिक्षक या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले आहेत.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. त्यांच्या त्या विचारांचा वारसा पुढे नेत रा. ब. काळे विद्यालयाने ‘सावित्रीच्या लेकीं’साठी शिक्षणाची वाट सुकर केली आहे.
मुख्याध्यापक कोळेकर म्हणाले, “रा. ब. काळे विद्यालयातील अनेक मुली कामगारांच्या, शेतमजुरांच्या आहेत. त्यांना शिक्षणासाठी कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, म्हणून शाळेने ही जबाबदारी उचलली आहे. सातवीपर्यंत या मुलींना एकही पेन विकत घ्यावे लागणार नाही, ही आमची जबाबदारी.”
‘आय सपोर्ट’ या उपक्रमामुळे शिक्षण केवळ वर्गातच नव्हे, तर समाजाच्या सहकार्यानेही बहरत आहे. हेच या योजनेचे खरे यश.


