
कोल्हापूर | प्रतिनिधी
खरेदीच्या बहाण्याने बेकरी आणि किराणा दुकानात जाऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून आलिशान मोटारीतून पसार होणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी जेरबंद केले.
अटक करण्यात आलेल्यांची नावे इम्रान शमशुद्दीन मोमीन (३८, रा. बेघर वसाहत, हेर्ले, ता. हातकणंगले) आणि सुदाम हणमंत कुंभार (४०, आंदळी, ता. पलूस, जि. सांगली) अशी आहेत.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २२ ग्रॅम सोन्याचे दागिने, आलिशान मोटार आणि दोन दुचाकींसह एकूण ९ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीत संशयितांनी शाहूपुरी, गोकुळ शिरगाव आणि शिरोळ येथे दागिने चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले की, या चोरट्यांकडून कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील चेनस्नॅचिंग आणि वाहन चोरीचे इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकरणात आणखी काही साथीदारांची नावे समोर येण्याची दाट शक्यता आहे.
गुन्ह्यातील आलिशान मोटारीचा तपास सुरू
चोरट्यांच्या ताब्यात सापडलेली आलिशान मोटार कोणाच्या नावावर आहे आणि त्यामागील व्यक्तींचा या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. हे दोघे किराणा आणि बेकरी दुकानांमध्ये खरेदीच्या बहाण्याने जाऊन महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर नजर ठेवत आणि क्षणार्धात हिसकावून पळ काढत असत.
सांगली फाट्याजवळ सापळा रचून अटक
शिरोळ आणि सांगवडे परिसरातील दागिने चोरी तसेच शाहूपुरीतील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये या दोघांचा सहभाग असल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे स्पष्ट झाले. त्यानंतर सहायक निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने तावडे हॉटेल–सांगली फाटा मार्गावर सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी तीन गुन्ह्यांची कबुली दिली.
वाहनांच्या नंबर आणि स्टीकरमध्ये फेरबदल
चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या मोटारी आणि दुचाकींचे नंबर चोरटे वारंवार बदलत असत. शिवाय, वेगवेगळ्या स्टीकरचा वापर करून तपास दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात होता. तरीही सहाय्यक निरीक्षक सागर वाघ, प्रविण पाटील आणि सुरेश पाटील यांच्या पथकाच्या दक्षतेमुळे संशयितांना जेरबंद करण्यात यश आले.