
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : पॅकर्स अँड मुव्हर्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून घरातून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सायन आणि काळाचौकी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही घटना १५ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली. सकाळी ९ ते ११ या वेळेत सायन परिसरातील दास्ती लाईट येथील घरातून ८.८० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, तर सायंकाळी ५.३० ते ६.३० च्या दरम्यान काळाचौकी हद्दीतील मेघवाडी, लालबाग येथील घरातून ३.४० लाख रुपयांचे दागिने आणि चांदीचे शिक्के चोरीस गेले. आरोपींनी “सामान शिफ्ट करायचा आहे” असा बहाणा करून घरात प्रवेश केला आणि पॅकिंगच्या वेळी मौल्यवान वस्तू लंपास केल्या.
सायन पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संदीप दिनेश विश्वकर्मा (२७) याला अटक करून त्याच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत केले. तर काळाचौकी पोलिसांनी कांदिवली परिसरातून प्रविण फुलचंद पांडे (२६), दुर्गेश दिवाकांत मिश्रा (२६), राकेश बळीराम यादव (२०) आणि पिंटू बबन सिंग (२८) या चौघांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल पोलिसांनी परत मिळवला आहे.
या कारवाईसाठी सायन आणि काळाचौकी पोलिसांच्या स्वतंत्र पथकांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीचा उपयोग करून आरोपींचा शोध घेतला.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर., सहायक पोलीस आयुक्त घनश्याम पलंगे आणि शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (काळाचौकी), अनंत साळुंखे (सायन) आणि त्यांच्या पथकातील अधिकारी स.पो.नि. अमित भोसले, पो.शि. गोपाळ चव्हाण, पराग शिंदे, विजय सोनावणे, संजय जगताप, ठोंबरे, शिवतरे, मोरे, जाधव, पाटील आणि तांत्रिक मदतनीस गोविंदा ठोके, यांनी विशेष परिश्रम घेतले.
पोलिसांच्या या जलद आणि समन्वयात्मक कारवाईमुळे शहरातील दोन गंभीर चोरींचा उलगडा होऊन नागरिकांचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.