
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील एका 72 वर्षीय व्यावसायिकाला “क्राइम ब्रँच अधिकारी” बनून फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी तब्बल 58.13 कोटींनी गंडा घातल्याचं उघड झालं आहे. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी “डिजिटल अरेस्ट” फसवणूक ठरली असून, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणात सात जणांना अटक केली आहे. फसवणुकीतील सुमारे 3.5 कोटींची रक्कम गोठवण्यात आली आहे.
फोनवरून सुरू झालं डिजिटल अरेस्ट ड्रामा
दक्षिण मुंबईतील या व्यावसायिकाला 19 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून एका व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःला टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचा (TRAI) अधिकारी असल्याचं सांगत, “तुमचा मोबाईल नंबर बेकायदेशीर संदेशांसाठी वापरण्यात आला आहे,” असं सांगितलं. लगेचच कॉल दुसऱ्या “अधिकाऱ्याकडे” ट्रान्सफर करण्यात आला—या वेळेस तो “मुंबई क्राइम ब्रँच”चा अधिकारी असल्याचं सांगत होता.
या बनावट अधिकाऱ्याने तक्रारदाराला “तुमचं बँक खातं मनी लॉन्डरिंगसाठी वापरलं गेलं आहे, त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे” असं सांगितलं. पुढील चौकशीसाठी सहकार्य करा आणि “खात्यातील सर्व पैसे सुरक्षित खात्यात वर्ग करा,” असा आदेश दिला.
बनावट पोलीस स्टेशन आणि न्यायालय व्हिडिओ कॉलवर
तक्रारदाराला आरोपींनी व्हॉट्सअॅपवरून व्हिडिओ कॉल केला. कॉलदरम्यान आरोपींनी बनावट पोलीस स्टेशन, पोलीस अधिकारी आणि “न्यायमूर्ती” दाखवत न्यायालयीन प्रक्रिया दाखवली. भीती आणि मानसिक दबावाखाली आलेल्या तक्रारदाराने 40 दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने 58.13 कोटी रक्कम विविध खात्यांत वर्ग केली.
यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
तपासात उघड झालं 6,500 खात्यांचं जाळं
तक्रारीनंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा क्र. 42/2025 नोंदवून तपास सुरू केला. भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमे आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांत्रिक तपासात कॉल्स VPN आणि TOR नेटवर्कद्वारे विदेशी IP वरून केल्याचं आढळलं. आर्थिक तपासात 13 स्तरांमधून पसरलेली तब्बल 6,500 “मनी म्युल” खात्यांची साखळी उघडकीस आली. अनेक खाती शेल कंपन्यांच्या नावाने उघडण्यात आली होती.
अटक झालेले आरोपी
1. शेख शाहिद अब्दुल सलाम (19)
2. जफर अकबर सय्यद (33)
3. अब्दुल नासीर अब्दुल करीम खुल्ली (51)
4. अर्जुन फोजीराम कडवासरा (52)
5. जेथाराम रहींगा कडवासरा (35)
6. इम्रान इस्माईल शेख (22)
7. मोहम्मद नवेद शेख (26)
सूत्रधाराचा शोध सुरू
या फसवणुकीतील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. फसवणुकीत सामील बँक कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा किंवा संगनमत होतं का, याचाही तपास सुरू आहे.
“ही आतापर्यंतची सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट फसवणूक असून, महाराष्ट्र सायबर सर्व बाजूंनी तपास करत आहे,” असं महाराष्ट्र सायबरचे प्रमुख यशस्वी सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.