
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत “डिजिटल अरेस्ट” प्रकारातील आंतरराज्यीय टोळीला गजाआड केलं आहे. आर.ए.के. मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे गुजरात आणि राजस्थानमध्ये सापळा रचत सहा आरोपींना अटक केली आहे.
फिर्यादीला एटीएस कंट्रोल, नवी दिल्ली आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मधून फोन आल्याचा बनाव करून, “तुमचं नाव पीएमएलए केसमध्ये आहे” असा खोटा धाक दाखवत तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. आरोपींनी व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलद्वारे स्वतःला पोलिस अधिकारी म्हणून सादर केलं होतं.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी १५ बँक खाते गोठवून १०.५ लाख रुपये परत मिळवले. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढत, तीन स्वतंत्र पथकं गुजरात आणि राजस्थानमध्ये पाठवण्यात आली होती. आरोपी वारंवार ठिकाणं बदलत असतानाही पोलिसांनी त्यांना जेरबंद करण्यात यश मिळवलं.
अटक आरोपींची नावे, सुरेशकुमार मगनलाल पटेल (५१), मुसरान इक्बालभाई कुंभार (३०), चिराग महेशभाई चौधरी (२९), अंकितकुमार महेशभाई शाह (४०), वासुदेव उर्फ विवान वालजीभाई बारोट (२७) आणि युवराज उर्फ मार्को लक्ष्मणसिंग सिकरवार (३४).
या टोळीने महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, झारखंड, गुजरात, दिल्ली, हरियाणा, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही अशा प्रकारच्या एकूण ३१ सायबर तक्रारींमध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे.
पनवेलमध्ये राहणाऱ्या ६८ वर्षीय नागरिकालाही याच टोळीने “एनआयए” अधिकाऱ्याचा आव आणत ४० लाखांची मागणी केली होती. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांचे पैसे वाचवण्यात यश आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, परिमंडळ ०४च्या पोलीस उपायुक्त रागसुधा, सहायक आयुक्त सचिन कदम, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी संदीप ऐदाळे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गोविंद खैरे, महेश मोहिते, सायबर अधिकारी योगेश खरात, आणि एटीसी पथकाच्या परिश्रमांमुळे शक्य झाली.
मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली नागरिकांना फसवणारी मोठी सायबर साखळी उघडकीस आली असून, आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.