
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतून पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या 29 वर्षीय रिसर्च स्कॉलरवर तिच्याच ओळखीच्या सहाध्यायाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या तरुणीने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी माहिम येथे राहत असून आरोपी लोअर परळचा रहिवासी आहे. हे दोघेही अमेरिकेतील इलिनॉईस युनिव्हर्सिटी अर्बाना-शॅम्पेन (UIUC) येथे उच्च शिक्षण घेत आहेत. दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडमार्फत झाली होती. काही काळातच या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.
दरम्यान, मुंबईत आल्यावर आरोपीने अभ्यासासाठी वांद्रे येथील एका आलिशान हॉटेलमध्ये पीडितेला बोलावले. मात्र, त्याठिकाणी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना 1 जानेवारी ते 12 जून 2025 या कालावधीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी आरोपी दुसऱ्या मुलीसोबत लग्नाबाबत चर्चा करत असल्याचे समजल्यावर तिने त्याला जाब विचारला. त्यावेळी त्याने तिच्यावर शिवीगाळ, मारहाण केली तसेच पेटवून देण्याची आणि प्रायव्हेट फोटो व व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली.
मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडितेने आपल्या आईला संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर मायलेकी थेट वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आणि आरोपीविरोधात तक्रार नोंदवली.
तक्रारीनुसार, आरोपीने विवाहाचं आमिष दाखवून अमेरिकेतही वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तो सध्या अमेरिकेत असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी भारतात आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, आरोपीचे वडील एका मोठ्या बॅंकेत वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याचे समोर आले असून, या प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.