
पुणे प्रतिनिधी
पुण्यात दहशतवादी कारवायांशी संबंधित मोठा कट उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि पुणे पोलिसांनी बुधवारी (८ ऑक्टोबर) रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली.
या कारवाईत १८ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील तपास असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
२० ठिकाणी एकाच वेळी छापे
कोंढवा, खडकी, खडक, वानवडी आणि भोसरीसह पुण्यातील सुमारे २० ठिकाणी पोलिस आणि ATS ने एकाचवेळी शोधमोहीम राबवली.
पुणे पोलिसांचे उपायुक्त (DCP) निखिल पिंगळे यांनी ‘सांगितले की, या कारवाईसाठी ATS चे सुमारे २०० अधिकारी आणि पुणे पोलिसांचे ५०० अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणांहून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दस्तऐवज, आणि संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कोथरूड तपासातून उलगडले धागे
ही कारवाई कोथरूड येथील आधीच्या तपासातून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार करण्यात आली आहे. या तपासादरम्यान दोन व्यक्तींना अटक झाली होती, ज्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यांच्या चौकशीतूनच “पुणे मॉड्यूल” नावाच्या नव्या दहशतवादी गटाचा तपास उघडकीस आला.
या मॉड्यूलमधील सदस्यांनी शहरात गुप्तपणे कार्य सुरू केल्याची माहिती ATS ला मिळाल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली.
2023 च्या ISIS प्रकरणाशी दुवे
या कारवाईचा संबंध 2023 मध्ये पुण्यात उघड झालेल्या ISIS-संबंधित दहशतवादी प्रकरणाशी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या प्रकरणात मुंबई, पुणे आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा आरोप होता.
तपासात आरोपींनी कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्ब चाचण्या घेतल्याचे, तसेच कोंढवा परिसरात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले होते.
या प्रकरणात अटक झालेल्या प्रमुख आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत :
मोहम्मद शहानाझ आलम,
रिझवान अली,
अब्दुल्ला शेख,
तलाह लियाकत खान,
मोहम्मद इम्रान (रतलाम, म.प्र.),
मोहम्मद युनूस (रतलाम, म.प्र.),
कादिर दस्तगीर पठाण,
समीब नासिरुद्दीन काझी (दोघेही कोंढवा),
झुल्फिकार अली बडोदवाला,
शमील साकिब नाचन,
आकिफ अतीक नाचन (ठाणे).
NIA चा समावेश
या प्रकरणातील एक आरोपी मोहम्मद आलम कोथरूडमधील गुन्ह्यानंतर पोलिस ताब्यातून फरार झाला होता. नंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष टीमने त्याला नोव्हेंबर २०२३ मध्ये अटक केली. या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत असून, मुंबईतील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सध्याची पुण्यातील छापेमारी ही त्या तपासाचा पुढील टप्पा असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
संशयितांची कसून चौकशी सुरू
ताब्यात घेतलेल्या १८ संशयितांची चौकशी सध्या सुरू असून, जप्त केलेल्या पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे.
पोलिस आणि ATS या दोन्ही संस्थांनी तपासाबाबत गोपनीयता राखण्याचा निर्णय घेतला असून, अधिकृत माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच दिली जाईल.
शहरात सावधगिरीचा माहोल
पुण्यातील या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, “ही कारवाई संभाव्य दहशतवादी नेटवर्कचा शोध घेऊन त्यांना निष्क्रिय करण्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक आहे.
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वीपणे पार पडली आहे.