
ठाणे प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यात रविवार, १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. ‘पोलिओमुक्त समाज’ या उद्दिष्टाकडे वाटचाल करत ० ते ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ही उप-राष्ट्रीय मोहीम राबवली जाणार असून, शहरी आणि ग्रामीण भागांचा या मोहिमेत समावेश आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरणासोबत नियमित एएफपी सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत लसीकरण केले जाणार आहे.
सन १९९५ पासून दरवर्षी राज्यात ही मोहीम सातत्याने राबविली जाते. त्याच परंपरेनुसार यावर्षी ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये लसीकरणाची व्यापक तयारी करण्यात आली आहे. “प्रत्येक बालकाला पोलिओच्या लसीचे दोन थेंब देणे ही केवळ पालकांची नव्हे, तर समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. लसीकरणाद्वारेच आपल्या मुलांचे आणि देशाचे भविष्य सुरक्षित राहू शकते,” असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या मोहिमेसाठी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती शिंदे यांनी समन्वय साधला असून, ठाणे जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सक्रिय सहभाग या मोहिमेत आहे.
महापालिकेचे आवाहन
ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. “० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे पालकांनी जवळच्या केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे,” असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील लसीकरणाचा आवाका
अंबरनाथ, कल्याण, शहापूर, भिवंडी आणि मुरबाड या ग्रामीण तालुक्यांमध्ये एकूण १ लाख ३१ हजार ११० बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील ६८ हजार ८३३ बालकांसह एकूण १ लाख ९९ हजार ९४३ बालकांना पोलिओची लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी १ हजार ८७५ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली असून, ४ हजार ७९२ आरोग्य कर्मचारी या मोहिमेत कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेने दिली.