
ठाणे प्रतिनिधी
ठाणे : ठाणे शहरात एक मोठा देहविक्री रॅकेट उघडकीस आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने (CIU) केलेल्या कारवाईत व्हॉट्सअॅपवरून रॅकेट चालवणारी एक महिला अटक करण्यात आली, तर तिच्या तावडीतून दोन तरुणी सुटल्या आहेत.
पोलीस तपासानुसार, आरोपी महिला सोशल मीडियाचा वापर करून तरुणींचे फोटो ग्राहकांपर्यंत पाठवत असे आणि सौदे ठरवले जात असत. एकदा सौदा निश्चित झाला की, ती स्वतः तरुणींना ठरलेल्या हॉटेलमध्ये घेऊन जात असे.
ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, 6 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बनावट ग्राहकाच्या सहाय्याने पोलिसांनी सापळा रचला. आरोपी महिला दोन तरुणींना घेऊन हॉटेलमध्ये आली. एका तरुणीचा सौदा 8,000 रुपयांत ठरवला गेला. पोलिस चौकशीत आरोपीने कबुल केले की, 3,000 रुपये पीडित महिलेला देण्यात येणार होते, तर उर्वरित 5,000 रुपये स्वतःकडे ठेवणार होती.
ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस सध्या आरोपीचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप चॅट तपासून ग्राहकांची माहिती तसेच रॅकेटमधील इतर सहभागींचा शोध घेत आहेत. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.
पोलीसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या रॅकेटबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.