
मुंबई प्रतिनिधी
वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ई-चलान कारवाईसाठी वाहतूक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी खाजगी मोबाईल फोनचा वापर करता कामा नये, असे स्पष्ट आदेश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.
परिवहन मंत्र्यांची नाराजी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात अलीकडेच वाहतूक संघटनांची बैठक झाली. या बैठकीत संघटनांच्या प्रतिनिधींनी तक्रार केली की, वाहतूक पोलीस खाजगी मोबाईलवर मोठ्या प्रमाणात गाड्यांचे फोटो काढतात आणि नंतर ते सोयीने ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करतात. या प्रक्रियेत अनेक वाहनधारकांवर चुकीची चलने फाडली जात असल्याची बाब पुढे आली.
या तक्रारीनंतर मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही यासंदर्भात स्पष्ट आदेश जारी झालेले असून काही घटकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्याने आता कडक कारवाईचे निर्देश दिले गेले आहेत.
चुकीची चलने थांबविण्याचा प्रयत्न
काही अधिकारी अद्याप स्वतःच्या मोबाईलवर फोटो काढून, वास्तविक वेळ बदलून, ई-चलान प्रणालीत अपलोड करतात. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने चलनफाड होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी, खाजगी मोबाईल वापरून चलनफाड करताना अधिकारी आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश साळुंके यांनी जारी केले.
राज्यभर पत्र पाठवले
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षक व महामार्ग पोलीस ठाण्यांना हे आदेश तातडीने अंमलात आणण्याच्या सूचना पाठवण्यात आल्या आहेत.