
मुंबई प्रतिनिधी
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यावरून राजकीय वादंग निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस ठेवण्यात आल्याचा आरोप कदम यांनी केला. या वक्तव्याला अनिल परब यांनी पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं.
कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटी किंवा शवगृहाशिवाय ठेवता येतो का? हीच समज नसताना कदम आरोप करत आहेत. बाळासाहेबांच्या निधनानंतर लाखोंनी दर्शन घेतलं. अशा परिस्थितीत त्यांच्या मृतदेहाबाबत असलेले आरोप शंभर टक्के खोटे आहेत,” असे परब म्हणाले.
परब यांनी पुढे स्पष्ट केले की, बाळासाहेब हयात असतानाच स्वतःचे मोल्ड तयार करून ठेवले होते. “रामदास कदम जे बोलतात त्यात तथ्य नाही. अंधेरीतील स्टेडियममध्ये त्या काळी अनेक क्रिकेटपटूंची मोल्ड तयार केली गेली होती, त्याच वेळी बाळासाहेबांचंही मोल्ड बनवलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी ते मोल्ड ठेवण्यात आले होते,” अशी माहिती परब यांनी दिली.
“तेव्हा अनेक मोठी मंडळी, शरद पवारांसह, उपस्थित होती. मग कोणत्या डॉक्टरांकडून कदमांना अशी माहिती मिळाली, हे त्यांनी स्पष्ट करावं,” असा सवालही परब यांनी उपस्थित केला.
बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेबाबतचा निर्णय कसा घेतला गेला, याची माहिती देताना परब म्हणाले, “सकाळी ६ वाजता अँब्युलन्सने पार्थिव शिवाजी पार्कवर नेण्याचा प्रस्ताव होता. मात्र प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर तो प्रस्ताव बदलण्यात आला आणि अंत्ययात्रेचा निर्णय झाला.”
“बाळासाहेबांनी कायदेशीर बाबींचा विचार करून मृत्यूपत्र तयार केलं होतं. आता १७ वर्षांनंतर या विषयावर राजकारण करून मूळ प्रश्नांपासून लोकांचं लक्ष भरकटवलं जात आहे,” अशी टीका करत परब यांनी कदमांविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचीही भूमिका घेतली.