
नांदेड प्रतिनिधी
गेल्या आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी व ढगफुटी सदृश पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरशः होत्याचं नव्हतं केलं आहे. शेतातील उभी पिके चिखलाखाली गाडली गेल्याने आणि प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने अर्धापूर तालुक्यातील निवृत्ती (बबन) सखाराम कदम (वय 48) या शेतकऱ्याने नैराश्यातून सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या या दुर्दैवी मृत्यूनंतर अवघ्या 12 तासांत त्यांच्या वृद्ध वडिलांचा हृदयद्रावक अंत झाल्याने एकाच घरातील दोन प्राण जाण्याने कोंढा गावावर शोककळा पसरली आहे.
अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाचा फटका
निवृत्ती कदम यांची खरीपाची पिके हातातोंडाशी आली होती. परंतु गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आणि शेतात गुडघाभर पाणी साचले. परिणामी संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली. आधीच दुष्काळ, सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याने त्रस्त असलेल्या निवृत्ती कदम यांनी या संकटातून मार्ग दिसेनासा झाल्याने टोकाचा निर्णय घेतला.
आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी
मृत्यूपूर्वी कदम यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी वडिलांचा आजार, नापिकी व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान यांचा उल्लेख केला आहे. याचबरोबर “मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, अतिवृष्टीचे नुकसान भरून काढण्यासाठी मदत मिळत नाही, सरकार शेतकऱ्यांना अक्षरशः मातीमोल करत आहे” अशी तक्रार त्यांनी नोंदवली.
पुत्रवियोगाचा धक्का असह्य ठरला
निवृत्ती कदम यांचे वडील, सखाराम कदम (वय 80), हे अनेक वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी होते. मुलाच्या आत्महत्येची बातमी त्यांच्या कानावर पडताच ते हा आघात सहन करू शकले नाहीत. पुत्रवियोगाच्या तीव्र धक्क्याने अवघ्या 12 तासांत त्यांनीही प्राण सोडले.
गावावर शोककळा, एकाच वेळी पिता-पुत्रांचा अंत्यसंस्कार
एकाच कुटुंबातील दोन जणांचा इतक्या थोड्या वेळात मृत्यू झाल्याने कोंढा गावात हळहळ व्यक्त होत आहे. आज (1 ऑक्टोबर) रोजी निवृत्ती कदम व त्यांचे वडील सखाराम कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या दुर्दैवी घटनेने अर्धापूर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि अपुऱ्या मदतीमुळे होणाऱ्या आत्महत्यांचे सावट ग्रामीण भागावर अजूनही गडद आहे.
ही घटना फक्त एका कुटुंबाची नव्हे, तर शेतकरी जीवनाच्या असहाय वास्तवाची वेदनादायी कहाणी आहे.