
वांद्रे प्रतिनिधी
मुंबई : वांद्र्यात ट्रॅफिकने अक्षरश, नाकी नऊ आणली आहे. बीकेसीहून येणारा २०० मीटरचा जोडरस्ता तयार झाला की दररोजच्या प्रवासकऱ्यांना दिलासा मिळेल, हे सगळ्यांना ठाऊक आहे. पण काम करायचं कोणीच नाही!
संत न्यानेश्वर नगर परिसरातील नाल्यालगतचा रस्ता चिखल, खड्डे, कचरा यांनी उद्ध्वस्त आहे. BMC म्हणते हे आमचं काम नाही, MMRDA म्हणते आमच्या ताब्यात नाही, तर SRA कानावर हात ठेवून बसली आहे. वरून जमिनीची मालकी जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्याचं सांगून सगळी यंत्रणा जबाबदारीपासून पळ काढत आहे.
कानकिया पॅरिस-टायटॅनिक सोसायटीलगतचा रस्ता अजूनही बंदच आहे. हे तीन रस्ते जोडले गेले असते, तर बीकेसी ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असा थेट मार्ग खुला झाला असता आणि वांद्र्यातील असह्य त्रास संपला असता. पण, प्रशासनातील आळशीपणा आणि “हे माझं काम नाही” ही भूमिका यामुळे जनता रोज या गोंधळाची किंमत मोजत आहे.
(शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे) स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी BMC, MMRDA आणि SRA च्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली.
“या रस्त्यांना मायबाप नाही. जनता रोज त्रास सहन करत आहे आणि प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलतंय. येत्या अधिवेशनात मी हा प्रश्न जिव्हाळ्याचा मुद्दा बनवणार,” असा इशारा सरदेसाई यांनी दिला.
वांद्र्यातील ही ‘मिसिंग लिंक’ म्हणजे अक्षरश, सामान्य जनतेच्या संयमाची परीक्षा आहे. रस्त्याचे काम होईपर्यंत जनता शासनाला प्रश्न विचारत राहील, “आमचा गुन्हा काय?