
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाची तब्बल २ कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित मास्टरमाईंडला सायबर पोलिसांनी हैदराबादमध्ये शिताफीने अटक केली. परदेशातून पदव्युत्तर आणि डॉक्टरेट मिळवलेला तसेच यूपीएससीची पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेला हा आरोपी विविध विद्यापीठांत प्राध्यापकही राहिला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
आरोपीचे नाव सितैया किलारु (वय ३४, रा. याप्रल, हैदराबाद, तेलंगण) असे असून, त्याने आयआयटी मुंबईतील प्राध्यापकाचे नाव वापरून महाविद्यालयाला केंद्र सरकारकडून एआय व ड्रोन प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखवले. ई-मेल व व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे दाखवत त्याने प्राध्यापकांचा विश्वास संपादन केला आणि कोट्यवधींचा गंडा घातला.
सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हैदराबादमध्ये शोधमोहीम राबवली. २१ सप्टेंबर रोजी आरोपीला अटक करून पुण्यात आणण्यात आले. न्यायालयाने त्याला २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
५० लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपीकडून पोलिसांनी तब्बल ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात १० डेबिट कार्ड, १३ पासबुक, १५ चेकबुक, ५ जी सिमकार्ड, चार मोबाईल, टॅब, लॅपटॉप, सोन्याचे दागिने, सोने खरेदीच्या पावत्या तसेच ४८ लाखांच्या दोन कारांचा समावेश आहे.
यूपीएससी उत्तीर्ण, तरी गुन्हेगारी मार्गावर
सितैया किलारु हा विजयवाडा येथील रहिवासी आहे. २०१० मध्ये ईएनटीसी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून त्याने स्टॅफोर्डशायर युनिव्हर्सिटी (लंडन) येथून मास्टर्स आणि बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटी येथून पीएच.डी. केली. २०१५ ते २०१८ दरम्यान तो हैदराबादमधील विविध विद्यापीठांत प्राध्यापक म्हणून कार्यरत होता.
२०१९ व २०२० मध्ये त्याने यूपीएससीची पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र, २०२२ पासून कौटुंबिक वादामुळे त्याने नोकरी सोडून गुन्हेगारी मार्ग स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त विवेक मासाळ, राजलक्ष्मी शिवणकर आणि सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात संदीप मुंढे, बाळासाहेब चव्हाण, नवनाथ कोंडे, संदीप कारकूड, टिना कांबळे, अमोल कदम, सचिन शिंदे, सुप्रिया होळकर, गंगाधर काळे, अदनान शेख, सतीश मांढरे, कृष्णा मारकड यांचा समावेश होता.