
मुंबई प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणशिंग फुंकले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीला वेग दिला असून या निवडणुका तीन टप्प्यांत पार पडण्याची शक्यता आहे. आयोगाने संपूर्ण प्रक्रिया 30 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल देत स्पष्ट केले होते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण व्हायला हव्यात. पुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचा ठाम पवित्राही कोर्टाने घेतला होता. त्यानंतर आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व महापालिकांच्या निवडणुकांसाठी तयारी वेगाने सुरू केली आहे.
मतदार याद्यांची प्रक्रिया
राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
• प्रारूप मतदार यादी : 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध
• हरकती व सूचना : 8 ते 14 ऑक्टोबर 2025
• अंतिम मतदार यादी : 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर
1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादीच या निवडणुकांसाठी अधिसूचित करण्यात आली आहे. मतदारांच्या नावांमध्ये व पत्त्यांमध्ये बदल न करता विधानसभा यादीप्रमाणेच रचना ठेवली जाणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक धुरळ्यासाठी सज्ज राज्य
मतदार याद्या अंतिम टप्प्यात आल्यानंतर नोव्हेंबरपासून जानेवारीपर्यंत राज्यात निवडणुकांचा धुरळा उडण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तीन टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया होण्याची शक्यता असून याबाबतचे वेळापत्रक आयोग लवकरच जाहीर करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उशीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती मिळाली आहे. आता काही महिन्यांत जिल्हा परिषदांपासून महापालिकांपर्यंत सत्तेचा झेंडा कोण लावतो याची उत्सुकता वाढली आहे.