
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
सांगवी पोलिसांनी तब्बल शंभराहून अधिक घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अखेर सापळा रचून जेरबंद केले. जयंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड असे या गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्याकडून सहा गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तब्बल २५ तोळे सोन्याचे दागिने पोलिख्यसांनी जप्त केले आहेत.
सांगवी, दापोडी व भोसरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्यांच्या घटनांना वेग आला होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगवी पोलिसांनी विशेष पथक तयार केले. या पथकाने आखलेल्या कारवाईत ‘जयड्या’ला अटक करण्यात आली. तपासात सांगवीत चार, भोसरी व दापोडीत प्रत्येकी एक अशी घरफोडी केल्याचे समोर आले आहे.
जयंत गायकवाड हा पोलिसांना चांगलाच परिचित असून, त्याच्यावर आधीच ४४ गुन्हे दाखल आहेत. इतर ५३ गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. आतापर्यंत एकूण १०३ घरफोड्यांचा गुन्हेगारी इतिहास त्याच्या नावावर जमा झाला आहे, अशी माहिती सांगवी पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवाजी पवार, उपायुक्त संदीप आटोळे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे व सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या पथकाने ही धडक मोहीम राबवली.