
नाशिक प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे बसथांब्याजवळ शनिवारी सकाळी दगडाने ठेचलेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. तपासाअंती हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले असून, मृताची पत्नी आणि तिचा प्रियकर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
संतोष उर्फ छोटू अशोक काळे (३८, रा. इंदिरा गांधी वसाहत-१, लेखानगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री तो घराबाहेर गेला; मात्र परतला नाही. रात्री उशिरापर्यंत न परतल्याने पत्नीने सासऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर बेपत्ता तक्रार दाखल झाली होती. सकाळी महामार्गालगत मृतदेह आढळला. हातावर कोरलेले ‘छोटू’ हे नाव पाहून ओळख पटली.
इंदिरानगर पोलिसांनी केलेल्या तपासात संतोष काळे यांच्या पत्नीचे अहिल्यानगर येथील प्रफुल्ल कांबळे या तरुणाशी गेल्या दहा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. यावरून पती-पत्नीमध्ये वाद होत असत. संतोषला दारूचे व्यसन होते आणि तो पत्नीला मारहाणही करीत असल्याची नोंद आहे. याबाबत पत्नीने प्रियकराशी चर्चा केली होती.
शुक्रवारी रात्री प्रफुल्ल कांबळे आणि त्याचे दोन साथीदार नाशिकला आले. त्यांच्यासोबत संतोष बाहेर गेला आणि त्याच्यात वाद झाले. या वादातूनच दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी प्रफुल्ल कांबळेला अहिल्यानगरहून अटक केली आहे, तर पत्नी पार्वतीलाही ताब्यात घेतले आहे.
पत्नी कटात सामील आहे का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. तिने स्वतःला निर्दोष ठरविताना ‘खुनाबाबत माहिती नव्हती’ असा दावा केला आहे. मात्र प्रियकराच्या चौकशीतून तिच्या सहभागाबाबतचा निर्णय होणार आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.